ग्रामपंचायत निवडणूकांची सोशल मीडियावर चर्चा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 27, 2020 06:48 PM2020-12-27T18:48:52+5:302020-12-27T18:52:22+5:30
चांदोरी : निवडणूक आयोगाने ग्रामपंचायत निवडणूकीची घोषणा केल्यापासून गोदाकाठ परिसरातील गावात राजकीय चर्चांना उधाण आले आहे. यामुळे गावातील चावडीवर मुलांपासून वयोवृद्धांपर्यंत निवडणुकीच्या चर्चा रंगत आहेत. आता तर उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरू झाल्याने, त्या चर्चा नॉनस्टॉप रंगू लागल्या आहेत. युवापिढीने तर सोशल मीडियावर अक्षरश: धुमाकूळ घातला आहे.
ग्रामपंचायत निवडणुकीला केवळ १८ दिवसांचा कालावधी शिल्लक आहे. कोरोना संक्रमणाची खबरदारी म्हणून या निवडणुका लांबविण्यात आल्या होत्या. ग्रामपंचायतीच्या आर्थिक व अधिकारात झालेली वाढ बघता, अनेकांना राजकारण खुणावू लागले आहे. युवावर्गही मोठ्या प्रमाणात याकडे आकृष्ट होऊ लागला आहे. युवकांच्या सहभागाने अनेकांची एकाधिकारशाही आता संपुष्टात येणार असल्याचे दिसते. गेल्या काही काळापासून नागरिकांमध्ये आता जागरूकता आलेली आहे, तरीही त्यांना निवडणुका जिंकणे कठीण झाले आहे. कार्यकर्ते पोसणे, निवडणुकीतील अपार खर्च यामुळे एखादा गरीब नेता नेतृत्वगुण असूनही निवडून येणे कठीण आहे. मात्र, शेवटी मतदार ठरवतील तोच नेता निवडून येईल, हे जरी खरे असले, तरी सत्तास्थापनेच्या वेळी पडद्याआड अनेक राजकीय घडामोडी असतात. मतदारांनी दिलेला कौल डावलून सत्ता स्थापन केली जाते. अशी अनेक उदाहरणे आहेत. यामुळे गुलाबी थंडीत याशिवाय दुसरी चर्चा ग्रामीण भागात होताना दिसत नाही.