औद्योगिक सुरक्षेवर चर्चा
By admin | Published: October 25, 2016 11:36 PM2016-10-25T23:36:13+5:302016-10-25T23:36:40+5:30
निमा-पोलीस बैठक : दिवाळीच्या सुटीत गस्तीची मागणी
सिन्नर : औद्योगिक क्षेत्रात वाढती गुन्हेगारी व दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर पोलीस संरक्षणात वाढ करण्यात यावी यासाठी निमाचे पदाधिकारी व एमआयडीसी पोलीस ठाण्याचे निरीक्षक एच. पी. कोल्हे यांच्या उपस्थितीत बैठक पार पडली.
माळेगाव औद्योगिक वसाहतीत सातत्याने घडणाऱ्या चोऱ्या, लूटमारीच्या घटना रोखण्यासाठी पोलीस प्रशासनाने ठोस पावले उचलावीत, सर्व उद्योजक यासाठी आवश्यक ते सहकार्य करतील, माळेगाव औद्योगिक वसाहतीसाठी स्वतंत्र हेल्पलाइन क्रमांक उपलब्ध करून द्याव्या आदि मागण्या निमाचे अतिरिक्त उपाध्यक्ष आशिष नहार यांनी केल्या. दिवाळीत कामगारांना मिळणारा बोनस व दर महिन्याच्या सहा ते दहा तारखेला होणारे पगार या बाबी लक्षात ठेवून चोरटे कामगारांची लूटमार करत असल्याचे ते म्हणाले. कारखान्यांच्या आवारातील भंगार चोरीचे प्रमाण वाढले आहे. भंगार गोळा करणाऱ्या महिलांच्या टोळ्या औद्योगिक क्षेत्रात सक्रिय असून, सुरक्षा रक्षकांना मारहाण करण्यास त्या घाबरत नाही, अशा टोळ्यांवर कडक कारवाई करावी, दिवाळीच्या पार्श्वभूमीवर चोऱ्या व लूटमारीचे प्रकार रोखण्यासाठी औद्योगिक वसाहतीच्या सहा प्रवेशद्वारांवर बॅरिकेड्स थांबा उभारून दिवस-रात्र गस्तीपथक नेमावे आदि मागण्या निमाचे अतिरिक्त चिटणीस सुधीर बडगुजर यांनी मांडल्या.
बैठकीस टी. एन. अग्रवाल, सुरेंद्र मिश्रा, एस. के. नायर, किरण जैन-खाबिया, प्रवीण वाबळे, शिवाजी आव्हाड, योगेश मोरे, किशोर इंगळे, सचिन कंकरेज, ए.आर. निमकर, एस.एन. बारी, बी.के. यादव, आर. डी. खेले, व्ही.एस. कडभाने,
राहुल शुक्ल, सदाशिव बोरसे, पांडुरंग कान्हे, एस. एस. घुगे, आशिष जीनतुरकर, नीलेश कांबळे, कैलास वाजे आदिंसह उद्योजक मोठ्या संख्येने उपस्थित होते. (वार्ताहर)