कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या सर्व पक्षीय नागरी सत्काराने पालकमंत्रीपदाची चर्चा
By संजय पाठक | Updated: February 1, 2025 18:34 IST2025-02-01T18:33:08+5:302025-02-01T18:34:28+5:30
नाशिकच्या पालकमंत्रीपदासाठी ॲड. माणिकराव कोकाटे, शिंदे सेनेचे नेते आणि शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे तसेच भाजपचे गिरीश महाजन यांची दावेदारी आहे.

कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या सर्व पक्षीय नागरी सत्काराने पालकमंत्रीपदाची चर्चा
नाशिक- नाशिकच्या पालकमंत्रीपदाचा तिढा कायम असतानाच राज्याचे कृषी मंत्री आणि पालकमंत्रीपदाचे दावेदार राष्ट्रवादीचे नेते माणिकराव काेकाटे यांचा आज नाशिकमध्ये सर्वपक्षीय नागरी सत्कार करण्यात आल्याने राजकीय निरीक्षकांच्या भुवया उंचावल्या आहेत. त्यामुळे नाशिकच्या राजकीय पक्षांना कोकाटे हेच पालकमंत्री हवेत अशीही मागणी जोर धरू लागल्याची चर्चा आहे.
नाशिकच्या पालकमंत्रीपदासाठी ॲड. माणिकराव कोकाटे, शिंदे सेनेचे नेते आणि शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे तसेच भाजपचे गिरीश महाजन यांची दावेदारी आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गिरीश महाजन यांची पालकमंत्रीपदी नियुक्ती घोषीत केली. मात्र, महायुतीतील प्रतिष्ठेच्या प्रश्नामुळे महाजन यांच्या नियुक्तीला स्थगिती दिली. अद्याप हा तिढा सुटलेला नसतानाच कृषीमंत्री माणिकराव काेकाटे यांचा सर्व पक्षीय नागरी सत्कार आज गुरूदक्षीणा हॉलमध्ये करण्यात आला. विशेष म्हणजे यापूर्वी अशाप्रकारे कोणत्याही मंत्र्यांचा सर्वपक्षीय सत्कार झालेला नाही. मात्र, काेकाटे यांच्या नशिबी हे सुख आले. शिंदे सेना, उध्दव सेना, भाजप- कॉंग्रेस असे महायुती आणि महाविकास आघाडीतील सर्वच पक्षांनी या कार्यक्रमाचे संयोजन केले होते. त्यामुळे सर्वांना पालकमंत्री म्हणून कोकाटेच हवे अशीही चर्चा रंगली.
माणिकराव कोकाटे पाचव्यांदा निवडून आले असून त्यांना मंत्रीपद प्रथमच मिळाले आहेत. मात्र, पूर्वाश्रमीचे काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते म्हणून काम करत असताना एनएसयुआय, युवक काँग्रेसमध्ये काम केले असून सर्वपक्षीय मित्रत्वाचे संबंध असल्याने नाशिकमध्ये सध्या असलेल्या तीन मंत्र्यापैकी भुसे किंवा झिरवाळ वगळता केवळ कोकाटे यांचाच अशा प्रकारे सर्व पक्षीय नागरी सत्कार झाला आहे. त्यामुळेच चर्चांना उधाण आले आहे.