नाशिक जिल्हा परिषदेच्या सदस्यांमध्येही पक्षांतराची चर्चा
By श्याम बागुल | Published: July 30, 2019 06:29 PM2019-07-30T18:29:01+5:302019-07-30T18:31:06+5:30
जिल्हा परिषदेचे सदस्य असताना विधानसभा निवडणूक लढवून विजयी झालेल्यांची प्रमाण जिल्ह्यात अधिक आहे. किंबहुना जिल्हा परिषदेनेच विधीमंडळाचे कवाडे खुले करून दिले आहेत. त्यामुळे जिल्हा परिषदेच्या किमान दहा ते पंधरा टक्के सदस्यांना प्रत्येक विधानसभा निवडणुकीचे वेध लागतात.
लोकमत न्युज नेटवर्क
नाशिक : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यात सर्वत्र पक्षांतराचे वारे वाहू लागल्याने नाशिक जिल्ह्यातही भाजप वगळता सर्वपक्षीयांमध्ये पक्षांतराची जोरदार चर्चा होवू लागली असून, विशेष करून जिल्हा परिषदेच्या सदस्यांमध्ये या संदर्भातील उत्सूकता अधिक आहे. बहुतांशी जिल्हा परिषद सदस्यांना आमदारकीचे स्वप्न पडून त्यांनी त्या दृष्टीने तयारीही चालविली असली तरी, युती, आघाडीकडून जागा कोणाला सुटते त्यावर पक्षांतर करण्यासाठी पक्ष ठरविण्याची भूमिका घेण्यात आली आहे.
जिल्हा परिषदेचे सदस्य असताना विधानसभा निवडणूक लढवून विजयी झालेल्यांची प्रमाण जिल्ह्यात अधिक आहे. किंबहुना जिल्हा परिषदेनेच विधीमंडळाचे कवाडे खुले करून दिले आहेत. त्यामुळे जिल्हा परिषदेच्या किमान दहा ते पंधरा टक्के सदस्यांना प्रत्येक विधानसभा निवडणुकीचे वेध लागतात. यंदा मात्र काहीशी वेगळी परिस्थिती असून, विरोधी पक्षाचे आमदार व वरिष्ठ पदाधिकारी मोठ्या संख्येने सत्ताधारी भाजप-सेनेकडे आकृष्ट होऊ लागल्याने दररोज पक्षांतराचे सोहळे रंगू लागले आहेत. त्यामुळे निवडणुकीला सामोरे जाण्यापुर्वी विरोधी पक्ष गर्भगळीत झाल्याच्या अवस्थेत आहे. त्यामुळे गेल्या आठ ते दहा महिन्यांपासून कॉँग्रेस व राष्टÑवादीकडून विधानसभा निवडणुकीची तयारी करणाऱ्या जिल्हा परिषदेच्या सदस्यांची घालमेल वाढली आहे. सत्ताधारी पक्षांकडे अगोदरच इनकमिंग अधिक असल्याने पक्षांतर करून उमेदवारी मिळेलच कोणतीही शाश्वती आजच्या घडीला कोणी देवू शकत नाही. अशा परिस्थितीत पक्षांतर करूनही उपयोग होईल काय असा प्रश्न त्यांना पडू लागला आहे. त्यातही भाजप व सेनेकडे असलेल्या इच्छुकांची संख्या पाहता, विधानसभा निवडणुकीत युती होण्याविषयीही या सदस्यांना साशंकता वाटू लागली आहे. सत्ताधाऱ्यांप्रमाणेच या सदस्यांनाही युती होऊच नये अशी वाटू लागले असून, तसे झाल्यास पक्षांतराचा विचार करणे अधिक योग्य व सोयीचे होईल असा त्यांचा ºहोरा आहे. त्यामुळे सध्या जिल्हा परिषदेत येणाºया सर्वपक्षीय सदस्यांमध्ये विधानसभा निवडणुकीची व त्यातल्या त्यात मतदार संघातील उमेदवारांविषयीच चर्चा झडू लागली आहे.
यंदाच्या विधानसभा निवडणुकीसाठी उपाध्यक्ष नयना गावीत, बांधकाम सभापती मनिषा पवार, नितीन पवार, हिरामण खोसकर, भास्कर गावीत, अमृता पवार, सिमंतीनी कोकाटे, डॉ. आत्माराम कुंभार्डे, अश्विनी आहेर या जिल्हा परिषद सदस्यांसह झेरॉक्स म्हणून ओळखले जाणारे समाजकल्याण सभापती सुनीता चारोस्कर यांचे पती माजी आमदार रामदास चारोस्कर, सदस्य अश्विनी आहेर यांचे पती जिल्हा बॅँकेचे अध्यक्ष केदा आहेर, सदस्य रूपांजली माळेकर यांचे पती विनायक माळेकर, सदस्य बलवीर कौर यांचे पूत्र बंटी गिल यांचे नावे चर्चेत आहेत. प्रत्येकाने आपल्यापरिने निवडणुकीला सामोरे जाण्याची तयारी केली असली तरी, उमेदवारी कोणाकडून करायची याचा निर्णय अधांतरीत ठेवण्यात आला आहे. निवडून आणण्याची क्षमता ठेवणाºया व सध्या हवा असलेल्या पक्षाकडेच या सदस्यांचा सर्वाधिक ओढा दिसत आहे.