संमेलनाध्यक्षपदाच्या चर्चेत डॉ. फोंडके, देवी यांचेही नाव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 23, 2021 04:14 AM2021-01-23T04:14:16+5:302021-01-23T04:14:16+5:30
नाशिक : साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदाची घोषणा दोन दिवसांवर आली असताना महामंडळाच्या सर्व विभागीय कार्यालयांकडून त्या विभागातील नावांची यादीदेखील महामंडळाला ...
नाशिक : साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदाची घोषणा दोन दिवसांवर आली असताना महामंडळाच्या सर्व विभागीय कार्यालयांकडून त्या विभागातील नावांची यादीदेखील महामंडळाला पोहोचवण्यात आली आहे. त्यात मुंबई विभागाकडून प्रख्यात विज्ञान कथा लेखक डॉ. बाळ फोंडके यांचे तसेच मावळत्या संमेलनाध्यक्षांकडून प्रख्यात साहित्यिक गणेश देवी यांचे नाव महामंडळाकडे पाठविण्यात आले आहे.
नाशिकच्या साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदाची अधिकृत घोषणा रविवारी (दि.२४ ) करण्यात येणार आहे. त्यापूर्वी महामंडळाच्या सर्व विभागीय कार्यालयांकडून संबंधित विभागातील नावे साहित्य महामंडळाच्या कार्यालयाकडे पाठविण्यात आली आहेत. त्यात मुंबई विभागाने विज्ञान कथा लेखक डॉ. बाळ फोंडके यांचे नाव पुढे केले आहे, तर महामंडळाच्या परंपरेनुसार मावळते अध्यक्ष फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांनी प्रख्यात साहित्यिक आणि भाषातज्ज्ञ गणेश देवी यांचे नाव पुढे केले आहे. त्यामुळे आता संमेलनाच्या अध्यक्षपदासाठीची चुरस वाढली आहे. यंदाच्या साहित्य संमेलनासाठी प्रथमच दोन विज्ञान कथा लेखकांची नावे पुढे आल्याने त्यातून कुणाच्या नावाची निवड होते की मावळत्या संमेलनाध्यक्षांचा पर्याय विचारात घेतला जातो, त्यावरदेखील चर्चा रंगू लागली आहे.
---इन्फो---
डॉ. फोंडके यांचे नाव प्रथमच
डॉ. फोंडके यांचे मूळ नाव गजानन पुरुषोत्तम फोंडके असले तरी ते डॉ. बाळ फोंडके नावानेच प्रख्यात आहेत. अंतराळ, आपले पूर्वज, खगोल, पशू-पक्षी, प्राणिजगत, भूगोल ही सहा पुस्तके त्यांनी ‘विज्ञान नवलाई' नावाच्या पुस्तक-मालिकेत लिहिली आहेत. काहीकाळ ते ‘सायन्स टुडे’ या मासिकाचे संपादकदेखील होते. विज्ञान सोप्या भाषेत उलगडून सांगण्यात त्यांचा हातखंडा असल्याने विज्ञान कथा वाचकांचे ते लाडके लेखक आहेत.
---देवी यांचे नाव सातत्याने चर्चेत---
भाषाविषयक प्रचंड मोठे काम तसेच आदिवासी समाजाच्या उत्थानासाठीचे मोठे कार्य केलेल्या डॉ. गणेश देवी यांचे नाव गत दशकापासूनच चर्चेत आलेले आहे. त्यांच्या स्थेच्या माध्यमातून देशभरातील ७८० बोलीभाषांचेदेखील सर्वेक्षण करण्यात त्यांचे मोठे योगदान आहे. साहित्य अकादमी पुरस्कारासह देशाच्या पद्मश्री पुरस्कारानेदेखील त्यांना सन्मानित करण्यात आले आहे.