जागतिक मानवाधिकार दिनानिमित्त चर्चासत्र
By admin | Published: December 13, 2015 10:02 PM2015-12-13T22:02:11+5:302015-12-13T22:04:30+5:30
संयुक्त उपक्रम : अनेक मान्यवरांचा सहभाग
नाशिक : जिल्हा विधी सेवा प्राधिकरण विभाग, एनबीटी लॉ कॉलेज आणि दिशा फाउंडेशनच्या वतीने जागतिक मानवाधिकार दिनानिमित्त चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते.
या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा विधी प्राधिकरणाचे सचिव व वरिष्ठ न्यायाधीश व्ही. आर. अग्रवाल, एन.बी.टी. लॉ कॉलेजच्या प्राचार्य डॉ. अस्मिता वैद्य, दिशा फाउंडेशनचे हेड आॅपरेशन अॅड. मिलिंद बाबर उपस्थित होते. याप्रसंगी अस्मिता वैद्य म्हणाल्या की, दिवसेंदिवस लोकांच्या समस्या वाढतच असून, न्यायालयात मोठ्या संख्येने खटले येत आहेत. त्यामुळे हजारोंच्या संख्येने प्रलंबित खटल्यांचे निकाल लागण्यासाठी खूप मोठा अवधी लागतो. जे दाखल होण्यापूर्वीच सामोपचाराने मिटविले जाऊ शकतात. यासाठी सर्वांनीच पुढाकार घेणे आवश्यक आहे, तसेच सुरक्षित आयुष्य म्हणजे सुरक्षित मानवाधिकार होय. यावेळी अॅड. मिलिंद बाबर यांनी मानव अधिकार दिनाचे महत्त्व, तसेच मानव अधिकार दिन का साजरा केला जातो, याचे स्पष्टीकरण त्यांनी दिले.
अॅड. सुवर्णा चिखलकर यांनी सांगितले की, मानव म्हणून जन्म घेतो त्यावेळेस त्याचे त्याला अधिकार मिळतात. स्वातंत्र, समता, विचार, व्यवसाय, नोकरी करण्याचा अधिकार प्रत्येकालाच दिलेला आहे. प्रत्येकाने आपले मूलभूत अधिकार जाणून घेणे असंघटित क्षेत्रातील लोकांनी एकत्रित होऊन न्याय मिळण्यासाठी दबाव आणणे गरजेचे आहे, असे विचार त्यांनी मांडले.
प्रा. सुनंदा काळे यांनी स्थलांतरित कामगार महिलांचे अधिकार यासंदर्भात माहिती दिली. तसेच हे अधिकार मिळवण्यासाठी जनजागृती कार्यक्रम घेणे आवश्यक आहे व त्याच्या अंमलबजावणीचा पाठपुरावा करणे, तसेच राज्य पातळीवर कार्यक्रम घेणे गरजेचे आहे. कमिटी स्थापन करणे व असे करणे ही प्रत्येक व्यक्तीची नैतिक जबाबदारी असल्याचे त्यांनी सुचविले.
जिल्हा विधी सेवा प्राधिकरण विभागाचे सचिव व वरिष्ठ न्यायाधीश अग्रवाल यांनी जिल्हा विधी सेवा प्राधिकरण कशा प्रकारे सुरू करण्यात आले, यासंदर्भात माहिती दिली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन किरण काळे यांनी केले. प्रा. एस. के. मांडवकर यांनी आभार प्रदर्शन केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी किरण काळे, रेखा साबळे, वैशाली तुंगार, किरण माळेकर, अमुल जोशी, प्रल्हाद जयकर, अजय खलाने, चंद्रकांत वाघेरे, संजय गवळी यांनी सहकार्य केले.