बस परवान्यासाठी नगरविकासमंत्र्यांशी चर्चा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 9, 2021 04:17 AM2021-02-09T04:17:21+5:302021-02-09T04:17:21+5:30
नाशिक- महापालिकेची शहर बस वाहतूक सेवा सुरू करण्यात अडथळा ठरलेला परवाना मिळावा यासाठी आयुक्त कैलास जाधव यांनी थेट नगरविकास ...
नाशिक- महापालिकेची शहर बस वाहतूक सेवा सुरू करण्यात अडथळा ठरलेला परवाना मिळावा यासाठी आयुक्त कैलास जाधव यांनी थेट नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी चर्चा केली. त्यांनी परिवहन मंत्र्यांशी चर्चा करून लवकरात लवकर परवाना मिळवून देण्याचे आश्वासन दिले आहे. परवाना मिळाल्यानंतर ही सेवा दहा ते बारा दिवसांनी सुरू होऊ शकेल, असे आयुक्तांनी सांगितले.
नाशिक महापालिकेच्या बससेेवेसाठी २०१८ मध्ये ठराव करण्यात आला. त्यानंतर नाशिक महानगर परिवहन महामंडळ ही कंपनी देखील स्थापन करण्यात आली. बस ठेकेदार, मनुष्यबळ पुरवठा असे सर्व ठेके निश्चित झाले आहेत. मात्र, त्यानंतरही बससेवा सुरू झालेली नाही. महापालिकेने प्रजासत्ताकदिनी ही सेवा सुरू करण्याची तयारी केली होती. मात्र, बस ऑपरेशनसाठी लागणारा परवाना वाहतूक खात्याकडून मिळालेला नाही. ही सेवा सुरू करण्यासाठी हा परवाना मिळाल्यानंतर प्रवासी भाडे निश्चित करण्यासाठी आरटीएला प्रस्ताव सादर करता येतोे. परंतु परवानाच रखडला आहे. गेल्या आठवड्यात पालकमंत्री छगन भुजबळ यांनी घेतलेल्या आढावा बैठकीत महापालिका आयुक्त कैलास जाधव यांनी आठ दिवसात परवाना मिळणार असल्याचे सांगितले होते. मात्र, अद्याप हा परवाना मिळालेला नाही.
यासंदर्भात नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी चर्चा झाली असून ते परिवहन मंत्री अनिल परब यांच्याशी चर्चा करून लवकरात लवकर परवाना मिळवून देणार असल्याचे आयुक्तांनी सांगितले.
इन्फो..
जूनमध्ये दुसरा टप्पा
शासनाकडून परवाना मिळाल्यानंतर ही सेवा सुरू करण्यासाठी दहा ते बारा दिवस कालावधी लागू शकेल. पहिल्या टप्प्यात पन्नास डिझेल बस सुरू केल्या जातील. एप्रिल मे महिन्यात शाळा कॉलेज साधारणत: बंद असतील त्यानंतर जूनपासून आणखी बस सुरू करण्यात येणार आहे.