दोन डोस घेतलेल्यांसाठी लोकल सुरू करता येईल का याबत विचार विनिमय सुरू : छगन भुजबळ
By ऑनलाइन लोकमत | Published: July 30, 2021 12:06 PM2021-07-30T12:06:13+5:302021-07-30T12:11:58+5:30
Coronavirus In Maharashtra : कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर लागू करण्यात आले आहेत निर्बंध. मॉलही ठराविक क्षमतेवर सुरू करता येतील का यावर विचार सुरू असल्याचं भुजबळ यांचं वक्तव्य.
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेनंतर सर्वसामान्यांसाठी मुंबईची लाईफलाईन असलेली लोकल सेवा बंद ठेवण्यात आली आहे. परंतु आता कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होत असल्यानं पुन्हा लोकल सेवा सुरू करण्याची मागणी होत आहे. अशा परिस्थितीत कोरोना प्रतिबंधात्मक लसीचे दोन डोस घेतलेल्यांसाठी लोकलसेवा कशी सुरू केली जाऊ शकते, याबाबत विचार विनिमय सुरू असल्याची माहिती मंत्री छगन भुजबळ यांनी दिली. नाशिकमध्ये पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी अनेक विषयांवर भाष्य केलं.
"दुकानांना वेळ वाढवून द्या, शनिवार रविवार पैकी एकच दिवस बंद ठेवण्यात यावा, मॉलही ५० टक्के क्षमतेनं सुरू करावे, ज्या ठिकाणी शाळा सुरू आहेत तिकडे कॉलेजेकडेही लक्ष द्यावं लागेल, यासंदर्भात आमच्या चर्चा झाल्या. या चर्चा झाल्यानंतर एक टास्क फोर्स आहे तो देशात, राज्यात, परदेशात काय सुरू आहे याचा विचार करून एक निर्णय घेत असतो," असं भुजबळ म्हणाले.
मी नुकतंच ऐकलं की केरळमध्ये दोन दिवस संपूर्ण लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे. याचाच अर्थ परिस्थिती संपूर्ण सुधारली असा नाही. लोकांच्या या मागण्या आहेत आणि आम्ही आमचं म्हणणं मांडलं आहे. टास्क फोर्सची आता बैठक झाली आहे. त्यात जो काही निर्णय ठरला असेल तो मुख्यमंत्री उद्धव ठाकरे जाहीर करतील, असंही त्यांनी नमूद केलं.