कांदा पिकावर रोगाचे आक्रमण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 13, 2021 04:33 AM2021-01-13T04:33:16+5:302021-01-13T04:33:16+5:30
---- बर्ड फ्लू साथीमुळे पोल्ट्री उद्योजक धास्तावले मालेगाव : देशातील केरळ, उत्तर प्रदेश, राजस्थान, मध्य प्रदेश, हरयाणा या सात ...
----
बर्ड फ्लू साथीमुळे पोल्ट्री उद्योजक धास्तावले
मालेगाव : देशातील केरळ, उत्तर प्रदेश, राजस्थान, मध्य प्रदेश, हरयाणा या सात राज्यांमध्ये बर्ड फ्लू आढळून आला आहे. यामुळे तालुक्यातील पोल्ट्री उद्योजक धास्तावले आहेत. मोठ्या प्रमाणात आर्थिक गुंतवणूक करून शेतकऱ्यांनी पोल्ट्री शेड उभारले आहेत. शेती व्यवसायाला जोडधंदा असलेला पोल्ट्री व्यवसाय बर्ड फ्ल्यूच्या साथीमुळे अडचणीत आला आहे.
-----
ग्रामीण भागात गावठी मद्याची सर्रास विक्री
मालेगाव : तालुक्यातील टेहरे, सौंदाणे, दाभाडी, कळवाडी, झोडगे व इतर गावांमध्ये गावठी मद्याची सर्रास विक्री केली जात आहे. सध्या ग्रामपंचायत निवडणूक सुरू असल्यामुळे गावठी मद्य विक्रीला उत आला आहे. पोलिसांकडून नावापुरती कारवाई केली जाते. या कारवाईनंतर मद्यविक्री करणारे परत आपले बस्तान बसवित आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी यात लक्ष घालावे, अशी मागणी होत आहे.
----
मालेगावी बाजारात पतंग विक्रीला
मालेगाव : येथील बाजारपेठेत मकर संक्रांती सणाच्या पार्श्वभूमीवर आकर्षक पतंग विक्रीला आले आहेत. लहान मुले पतंग खरेदी करताना दिसत आहेत. मांजा विक्रीला बंदी असताना, काही दुकानदारांकडून मांजाची विक्री केली जात आहे. पोलिसांनी मांजा विक्री करणाऱ्या दुकानांची तपासणी करून संबंधितांवर कारवाई करावी, अशी मागणी केली जात आहे.
-----
टेहरे फाट्यावर उड्डाणपूल उभारण्याची मागणी
मालेगाव : मुंबई-आग्रा महामार्गावरील टेहरेजवळ उड्डाण पूल उभारावा, अशी मागणी केली जात आहे. शहराबाहेरून जाणाऱ्या सोयगाव-टेहरे चौफुलीवर मोठ्या प्रमाणात वाहतूककोंडी होत आहे. अवजड वाहने वळविण्यास अडचण निर्माण होत आहे, तसेच अपघातांचे प्रमाण वाढले आहे. या ठिकाणी उड्डाणपूल उभारल्यास वाहतूककोंडीची समस्या सुटणार आहे.
-----
राजमाता जिजाऊ उद्यान खुले करण्याची मागणी
मालेगाव : लाखो रुपये खर्च करून उभारण्यात आलेले राजमाता जिजाऊ उद्यान पावसाळ्यापासून बंद आहे. उद्यानाची व खेळणीची साफसफाई करून मुलांना व ज्येष्ठ नागरिकांना उद्यान खुले करावे, अशी मागणी केली जात आहे. उद्यान बंद असल्यामुळे लहान मुलांचा हिरमोड होत आहे.
----
काटवन परिसरात बसच्या फेऱ्या पूर्ववत करण्याची मागणी
मालेगाव : गेल्या ४ जानेवारीपासून शाळा, महाविद्यालये सुरू झाले आहेत. तालुक्यातील वडनेर, नामपूर, काटवन भागातील विद्यार्थी मालेगावी शिक्षणासाठी ये-जा करीत असतात. मात्र, मालेगाव-साक्री बस फेरी बंद असल्यामुळे विद्यार्थ्यांचे हाल होत आहेत. विद्यार्थ्यांना वेळेवर बस उपलब्ध होत नसल्यामुळे त्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे.
----
घनकचरा विलगीकरणाबाबत मनपाचे नागरिकांना आवाहन
मालेगाव : महापालिका क्षेत्रातील घनकचरा विलगीकरण व व्यवस्थापनासाठी वॉटर ग्रेस कंपनीला ठेका दिला आहे. नागरिकांनी विघटनशील (कुजणारा, ओला) व न कुजणारा सुका कचरा स्वतंत्रपणे महापालिकेच्या घंटागाडीत टाकावा, अन्यथा संबंधितांवर कायदेशीर कारवाई केली जाईल, असा निर्धार मनपा आयुक्त दीपक कासार यांनी केला आहे.