पूर ओसरल्याने आता शहरात रोगराईचे आव्हान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 6, 2019 01:53 AM2019-08-06T01:53:53+5:302019-08-06T01:54:21+5:30
कमी झालेला पाऊस आणि त्याबरोबरच गोदावरीसह अन्य नद्यांच्या महापुराची तीव्रता कमी होऊ लागली असून, त्यामुळे आता चिखल हटविण्याबरोबरच स्वच्छतेचे मोठे आव्हान उभे राहिले आहे. ठिकठिकाणी असलेली अस्वच्छता, रस्त्यावर साचलेला कचरा आणि अन्य साहित्याचे ढीग यामुळे रोगराई वाढण्याची भीती निर्माण झाली आहे.
नाशिक : कमी झालेला पाऊस आणि त्याबरोबरच गोदावरीसह अन्य नद्यांच्या महापुराची तीव्रता कमी होऊ लागली असून, त्यामुळे आता चिखल हटविण्याबरोबरच स्वच्छतेचे मोठे आव्हान उभे राहिले आहे. ठिकठिकाणी असलेली अस्वच्छता, रस्त्यावर साचलेला कचरा आणि अन्य साहित्याचे ढीग यामुळे रोगराई वाढण्याची भीती निर्माण झाली आहे. त्यामुळे महापालिकेची यंत्रणा कामाला लागली असून, आरोग्य विभागाने विभागनिहाय नोडल अधिकाऱ्यांची नियुक्ती करतानाच पूरग्रस्त भागात वैद्यकीय पथकांमार्फत सर्वेक्षण सुरू केले आहे, अशी माहिती महापालिकेचे आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. राहुल गायकवाड यांनी दिली. रोगराईची शक्यता गृहीत धरून मनपाच्या मोठ्या रु ग्णालयांमध्ये आपत्कालीन कक्ष सुरू करण्यात आले आहेत.
रविवारी झालेल्या अतिवृष्टीनंतर सायंकाळी पाऊस कमी झाला. सोमवारीदेखील बºयापैकी पाऊस कमी झाल्याने सर्वच नद्यांचे पुराचे पाणी ओसरू लागले आहे. मात्र त्यामुळे ठिकठिकाणी गाळामुळे तसेच कचरा दिसत असून, अनारोग्याचे वातावरण आहे. पावसाने खंड घेतला की शहरात ठिकठिकाणी साचलेल्या पाण्यात डेंग्यू डासांची उत्पत्ती होते आणि मलेरिया तसेच डेंग्यूची साथ पसरते, अशी भीती आता व्यक्त केली जात आहे.
ज्या ठिकाणी पाणी साचले किंवा पुरामुळे नुकसान झाले आहे त्याठिकाणी दूषित पाणीपुरवठ्याचीदेखील शक्यता असून, खोकला, ताप तसेच अन्य आजार होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. यासंदर्भात आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी दोन दिवस शहरात दौरा केल्यानंतर आरोग्य आणि वैद्यकीय विभागाला रोगराई प्रतिबंधक उपाययोजना करण्यासाठी तातडीने नियोजन करण्याचे निर्देश दिले आहेत.
त्यानुसार सहा विभागांसाठी स्वतंत्र नोडल अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली असून, पाऊस थांबताच धूर फवारणी करण्याचे आदेश मलेरिया विभागाला देण्यात आले आहेत. पूरग्रस्त भागात वैद्यकीय पथके तैनात करण्यात आली आहेत. त्याचप्रमाणे ज्याठिकाणी नागरिकांना तात्पुरते स्थलांतरित करण्यात आले, त्याठिकाणी महापालिकेच्या पथकांनी जाऊन आरोग्य तपासणी केली तसेच उपचार सुरू केले आहेत. महत्त्वाच्या रु ग्णालयांमध्ये वैद्यकीय अधिकारी वाढविण्यात आले असून, औषध साठा पुरेश प्रमाणात उपलब्ध करून देण्यात आला आहे.
घरभेटींना प्रारंभ
महापालिकेच्या आरोग्य आणि वैद्यकीय विभागाने तात्पुरत्या स्वरूपात स्थलांतरित झालेल्या नागरिकांच्या आरोग्य तपासणीबरोबरच घरभेटीदेखील देण्यास प्रारंभ केला आहे. नागरिकांची तपासणी करतानाच जनजागृतीदेखील करण्यात येणार आहे.