गढूळ पाणीपुरवठ्यामुळे आजारांचा फैलाव
By admin | Published: June 16, 2016 11:43 PM2016-06-16T23:43:09+5:302016-06-17T00:15:01+5:30
वडाळागाव : लहान मुले, ज्येष्ठांना उलट्या, अतिसाराचा त्रास
नाशिक : वडाळागाव परिसरात पंधरवड्यापासून दैनंदिन पाणीपुरवठा गढूळ स्वरूपाचा होत आहे. त्यामुळे या दूषित पाण्याद्वारे विविध आजारांचा फैलाव होत असून, नागरिक त्रस्त झाले आहेत. उलट्या, जुलाब, तापाचे रुग्ण परिसरात वाढत आहे.
मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात वडाळागाव भागात गटारीच्या सांडपाण्याप्रमाणे दुर्गंधीयुक्त दैनंदिन पाणी नळांद्वारे येत होते. त्यानंतर काही दिवस शुद्ध पाण्याचा पुरवठा झाला; मात्र पुन्हा या परिसराला दूषित पाणीपुरवठा होऊ लागल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. झीनतनगर भागात नळांना पाणी येत नसून टॅँकरद्वारे पाण्याचा पुरवठा केला जात आहे. या टॅँकरमधून पुरविण्यात येणाऱ्या पाण्यामुळेदेखील येथील नागरिकांच्या आरोग्याच्या तक्रारी वाढल्याचे चित्र आहे. झीनतनगर परिसरातील रुग्ण अधिक येत असल्याचे खासगी डॉक्टरांचे म्हणणे आहे. तसेच अन्य भागांमधूनही अतिसार, पोटदुखी, ताप, अंगदुखीच्या तक्रारी असलेल्या रुग्णांचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे या भागात गॅस्ट्रो, कावीळ, विषमज्वर यांसारख्या आजारांची लक्षणे असलेल्या रुग्णांची संख्या वाढत आहे. या रुग्णांमध्ये लहान मुले, महिला, ज्येष्ठ नागरिकांचे प्रमाण अधिक आहे. भूक मंदावणे, घशाला कोरड पडणे, पोटदुखी, डोकेदुखी, अंगाला खाज येणे, अतिसार, लघवी पिवळी होणे, ताप येणे अशा विविध आरोग्याच्या तक्रारी नागरिकांमध्ये वाढल्या आहेत. वडाळागाव परिसरात दूषित पाणीपुरवठा होत असून, याकडे पाणीपुरवठा विभागाकडून दुर्लक्ष केले जात आहे. (प्रतिनिधी)