नाशिकमध्ये रोगराई सुरूच डेंग्युचे दीड शतक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 4, 2018 07:01 PM2018-09-04T19:01:47+5:302018-09-04T19:04:49+5:30
नाशिक मध्ये अनेक ठिकाणी डेंग्यु रूग्ण आढळल्यानंतर महापालिकेच्या वतीने डास निर्मुलन फवारणी केली जाते. त्याच बरोबर घरांची तपासणी केली असता आजुबाजूच्या घरांमध्येच डास आढळतात. त्यामुळे महापालिकेने आता डासांची उत्पत्ती स्थळे ज्या घरात आढळतील, तेथे प्रति ठिकाण पाचशे रूपये दंड करण्याचा प्रस्ताव तयार केला आहे.
नाशिक - शहरात पावसाळ्यामुळे जलजन्य आणि अन्य आजारांनी थैमान घातले असून गेल्या महिन्यात डेंग्युचे दीड शतक झाले आहे. याशिवाय स्वाईन फ्ल्यूचे १७ रूग्ण आढळले असून चिकनगुन्याच्या रूग्णांची संख्या चाळीस वर गेले आहे.
दरवर्षी पावसाळ्यात डासांमुळे डेंग्यु आणि चिकनगुन्याची साथ पसरते. यंदा जानेवारीपासून आत्तापर्यंत १ हजार १३३ डेंग्यूचे संशयीत रूग्ण आढळले असून त्यात ३६८ आत्तापर्यंतचे पॉझीटीव्ह रूग्ण आढळले आहेत. गेल्या महिन्यात १४८ रूग्ण आढळले आहेत. आत्तापर्यंत डेंग्युमुळे एकाचाही मृत्यू झाल्याची महापालिकेत नोंद नाही. मात्र, स्वाईन फ्ल्यु मुळे आत्तापर्यंत दोन रूग्ण दगावले आहेत. शहरात गेल्या महिन्यापासून आत्तापर्यंत १७ स्वाईन फ्लुचे रूग्ण आढळले आहेत. त्यामुळे हे देखील महापालिकेसमोर आव्हान ठाकले आहे. याशिवाय चिकन गुनीयाचे आत्तापर्यंत ४० रूग्ण आढळले असून त्यापैकी २१ रूग्ण गेल्या महिन्यात आढळले आहेत.
महापालिकेच्या वतीने मोठ्या प्रमाणात जनजागृती मोहिम हाती घेण्यात आली आहेत. विशेषत: डेंग्यु डासांच्या अळ्यांची उत्पत्ती रोखण्यासाठी एक लाख प्रबोधन पत्रे वाटण्यात आली आहेत. तसेच डासांची निर्मिती होत असलेल्या व्यावसायिकांना दंड ठोठावण्यात आला असून पेस्ट कंट्रोल च्या ठेकेदाराकडून कामात कुचराई झाल्याने त्याच्याकडून १ लाख ९३ हजार रूपयांचा दंड वसुल करण्यात आला आहे.