कोरोनाव्यतिरिक्त अन्य आजारांनी अत्यवस्थ रुग्णांची समस्या बिकट !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 25, 2021 04:13 AM2021-04-25T04:13:50+5:302021-04-25T04:13:50+5:30
नाशिक : जिल्ह्यात मार्चच्या प्रारंभापासून पुन्हा कोरोनाचे थैमान सुरू झाल्याने या आजाराच्या धास्तीमुळे अनेक नागरिकांनी त्यांच्या पूर्वीपासूनच्या रोग, आजारासाठी ...
नाशिक : जिल्ह्यात मार्चच्या प्रारंभापासून पुन्हा कोरोनाचे थैमान सुरू झाल्याने या आजाराच्या धास्तीमुळे अनेक नागरिकांनी त्यांच्या पूर्वीपासूनच्या रोग, आजारासाठी नियमितपणे हॉस्पिटलमध्ये जाणे टाळले. तसेच अन्य आजारांसाठीच्या रुग्णांना जाण्यासाठी शासनाचे एकमेव सुपरस्पेशालिटी हॉस्पिटल उपलब्ध आहे. मात्र, तिथेदेखील केवळ चार आजारांशी निगडीत उपचार होत असल्याने अन्य गंभीर रुग्णांनी कुठे जावे, हा प्रश्न बिकट झाला आहे. तसेच अन्य गंभीर रुग्णांना कोणत्याही हॉस्पिटलमध्ये गेल्यास प्रथम कोविड टेस्ट करण्याची सक्ती असून, त्यानंतरही असे रुग्ण कोरोनाच्या दहशतीत रहात असल्याने अशा रुग्णांची अवस्था द्विधा झाली आहे.
त्यामुळे अनेक नागरिकांचे आजार या दीड महिन्यांच्या कालावधीत बळावले आहेत. तसेच काही रुग्णांनी टाळलेल्या शस्त्रक्रिया त्यांच्या जिवावर बेतणाऱ्या ठरत असल्याचेदेखील काही उदाहरणांतून निष्पन्न झाले आहे. शहर आणि जिल्ह्यात कॅन्सर, टीबी, किडनी, हार्ट पेशंटचे प्रमाण दशकभरापासून खूप मोठे आहे. त्यातील प्रत्येकजण आपापल्या परीने डॉक्टरी उपचार, थेरपी, आवश्यकतेनुसार ऑपरेशन्स असे सर्व प्रकारचे उपचार घेत आले होते. मात्र, दिवाळीनंतर कमी झालेल्या कोरोनामुळे पुन्हा नियमित उपचारांना प्रारंभ करण्यात आला होता. परंतु, मार्चच्या प्रारंभापासून कोरोनामुळे अनेक व्याधीग्रस्त नागरिकांनी त्यांच्या नियमित चाचण्या आणि उपचार करण्यासाठी हॉस्पिटलमध्ये जाणेदेखील टाळले आहे.
इन्फो
कोरोनाची धास्ती ठरते जीवघेणी
हॉस्पिटलमध्ये गेल्यावर तेथील अन्य कुणा नागरिकाकडून कोरोनाची बाधा होईल, अशी धास्ती बहुतांश नागरिकांना वाटत होती. किंबहुना अन्य कुणाशी संपर्क आला नाही तरी हॉस्पिटलमधील कुणी कर्मचारी बाधित असण्याची भीती नागरिकांच्या मनात आहे. त्यामुळे या काळात घरीच थांबलेल्या अनेक नागरिकांचे रोग बळावले असल्याने आता त्यांना विपरीत परिस्थितीला तोंड द्यावे लागत आहे.
इन्फो
विशिष्ट आजारांच्या तीव्रतेत वाढ
ऑक्टोबरमध्ये कोरोनाची लाट काहीशी कमी झाल्यानंतर अनेक नागरिकांनी नोव्हेंबरच्या प्रारंभापासून त्यांच्या नियमित डॉक्टर, रुग्णालयांमध्ये जाण्यास प्रारंभ केल्यानंतर त्यांच्या व्याधीची तीव्रता घटली. मात्र, आता पुन्हा दीड महिन्यापासून घरीच थांबण्याची वेळ आल्याने अशा आजारांनी उचल खाल्ली आहे. प्रामुख्याने कॅन्सर, हार्ट, किडनी रुग्णांचे प्रमाण सर्वांत मोठे असल्याचे आढळून आले आहे.
इन्फो
मनपाची सातपैकी पाच रुग्णालये सामान्यांना उपलब्ध
नाशिक शहरातील महापालिकेच्या सात रुग्णालयांपैकी केवळ पंचवटीतील इंदिरा गांधी रुग्णालय आणि नाशिकरोडचे नवीन बिटको हॉस्पिटल हेच कोविडसाठी आरक्षित आहेत. अन्य पाच रुग्णालयांमध्ये सामान्य नागरिकांना त्यांच्या अन्य आजारांसाठी जाण्याची मुभा आहे. मात्र, मनपाच्या रुग्णालयांवर नागरिकांचा फारसा विश्वास नसल्याने तिथे नागरिकांचा फारसा प्रतिसाद नसतो.
(ही डमी आहे. )