मनसेच्या नगरसेवकांमध्येच आता असंतोष धुमसू लागला
By admin | Published: February 2, 2015 12:44 AM2015-02-02T00:44:07+5:302015-02-02T00:44:50+5:30
मनसेच्या नगरसेवकांमध्येच आता असंतोष धुमसू लागला
नाशिक : ‘माझ्या हाती सत्ता द्या, मी शहराचा चेहरामोहरा बदलून दाखवतो’, असे आवाहन करत मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी नाशिक महापालिकेत सत्तेची फळे तीन वर्षे चाखली; परंतु ज्यांच्या हाती नवनिर्माणाची सूत्रे सोपविली त्या महापौर आणि पदाधिकाऱ्यांच्या कचखाऊ भूमिकेमुळे सत्ताधारी मनसेच्या नगरसेवकांमध्येच आता असंतोष धुमसू लागला असून, ठाकरी धाक गायब झाल्याची भावना बोलून दाखविली जात आहे. त्यातच महापालिका मुख्यालयात महापौर हजेरी लावत नसल्याने पालिकेत गाऱ्हाणे घेऊन येणाऱ्या नागरिकांचा ओघ उपमहापौर आणि आयुक्तांकडे वाढू लागला आहे. नाशिककरांनी ४० नगरसेवक निवडून देत राज ठाकरे यांच्या हाती महापालिका सुपूर्द केली, परंतु पहिल्या अडीच वर्षांत महापौरांसह पदाधिकाऱ्यांना अपेक्षित असा प्रभाव न टाकता आल्याने मनसेवर चोहोबाजूने टीका झाली. लोकसभा-विधानसभा निवडणुकीतही विरोधकांनी राज्यभर प्रचारसभांमधून नाशिक महापालिकेतील मनसेच्या अपयशाचे पाढे वाचले. परिणामी, मनसेला दारुण पराभवाला सामोरे जावे लागले. दरम्यान, सप्टेंबर २०१४ मध्ये पुन्हा एकदा झालेल्या महापौरपदाच्या निवडणुकीत राष्ट्रवादीचा टेकू घेऊन राज ठाकरे यांनी पालिकेत मनसेचाच महापौर विराजमान केला. त्यानंतर राज ठाकरे यांनी दोन-तीन वेळा नाशिक दौरे करत कामांना चालना देण्याचाही प्रयत्न केला. परंतु महापालिकेत सत्ताधारी पक्ष असलेल्या मनसेमध्येच आता विसंवादाचे सूर उमटू लागले असून, प्रभागांमध्ये कामे होत नसल्याची ओरड करण्यात सत्ताधारी पक्षाचेच नगरसेवक आघाडीवर आहेत. महासभांमध्येही सत्ताधाऱ्यांतूनच महापौरांना आव्हान देण्याचे प्रयत्न होत आहेत. मनसेतील अंतर्गत कारभाराला आणि राजकारणाला कंटाळूनच इंदिरानगर भागातील नगरसेवक सतीश सोनवणे यांनी भाजपाची वाट धरली, तर माजी आमदार वसंत गिते यांच्या भाजपातील प्रवेशानंतर आणखी काही नगरसेवक पक्षाला रामराम करण्याच्या तयारीत असल्याची चर्चा सुरू झाली आहे. मनसेने पहिल्या अडीच वर्षांत मौनी महापौर बसविल्यानंतर आताही विद्यमान महापौरांबद्दल तेच विशेषण लावले जाऊ लागले असून, महापौर मुख्यालयात भेटत नसल्याची तक्रार नगरसेवकांबरोबर नागरिकांकडूनही होत आहे. महापौरांच्या कक्षात अंधार दाटला असतानाच लगतच्या उपमहापौरांच्या कक्षात मात्र नागरिक व लोकप्रतिनिधींचा राबता सुरू असतो. आयुक्तही व्यस्त कार्यक्रमांतून वेळ काढत अभ्यागतांसाठी वेळ देत असल्याने तिथेही गर्दीचा माहोल असतो. राज ठाकरे यांनी नागरिकांमध्ये मिसळून त्यांच्याशी संवाद साधा आणि संपर्क वाढवा, असा कानमंत्र देऊनही विद्यमान महापौरांसह पदाधिकारी मात्र ढिम्म असून, त्याचा फायदा विरोधक उचलत आहेत. मनसेच्या पदाधिकाऱ्यांसह नगरसेवकांवर असलेला ठाकरी धाकच गायब झाल्याची भावना खुद्द मनसेतील काही सदस्यच बोलून दाखवत आहेत. (प्रतिनिधी)