ठाकरे गटाचे नाराज विजय करंजकर यांची मराठा समाजाच्या मेळाव्यात हजेरी, चर्चांना उधान; राजकीय चर्चा केली नसल्याचा दावा
By संजय पाठक | Published: March 28, 2024 04:46 PM2024-03-28T16:46:06+5:302024-03-28T16:47:19+5:30
...मात्र आपण राजकीय दृष्टीने नव्हे तर समाजाची बैठक म्हणून उपस्थित राहिलो असे स्पष्टीकरण करंजकर यांनी दिले.
नाशिक - शिवसेनेच्या ठाकरे गटाच्या वतीने ज्या विजय करंजकर यांना लोकसभेच्या नाशिकच्या जागेची कबुली देण्यात आली होती. त्यांचा ऐनवेळी पत्ता कापल्याने नाराज झालेल्या करंजकर यांनी निवडणूक लढवण्याचा निर्णय घेत बंडखोरीचे संकेत दिले आहेत. त्यातच ते सकल मराठा समाजाच्या बैठकीस उपस्थित असल्याने चर्चेचा विषय ठरला. नाशिक आणि दिंडोरी लोकसभा मतदार संघात उमेदवार उभे करण्यासाठी ही बैठक हेाती. मात्र आपण राजकीय दृष्टीने नव्हे तर समाजाची बैठक म्हणून उपस्थित राहिलो असे स्पष्टीकरण करंजकर यांनी दिले.
ठाकरे गटाच्या वतीने विजय करंजकर हेच उमेदवार असणार अशी चर्चा गेल्या वर्षभरापासून होती. कारण तसे संकेत पक्ष प्रमुख आणि उत्तर महाराष्ट्र संपर्क प्रमुखांनी देखील दिले हेाते. मात्र, ऐनवेळच्या घडामोडीत राजकीय विजय करंजकर यांची उमेदवारी कापण्यात आली आणि सिन्नरचे माजी आमदार राजाभाऊ वाजे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. त्यामुळे नाराज झालेल्या करंजकर यांनी बुधवारी (दि. २७) समर्थकांच्या बैठकीत नाराजी व्यक्त केली आणि ऐनवेळी उमेदवारी नाकारली असली तरी आपली सर्व तयारी झाली असल्याने निवडणूक लढविणारच असे सांगून बंडखोरीचे संकेत दिले.
दरम्यान, गुरूवारी (दि.२८) छत्रपती संभाजीनगर रोडवर एका लॉन्समध्ये झालेल्या सकल मराठा समाजाच्या बैठकीला विजय करंजकर यांनी हजेरी लावली. त्यामुळेच करंजकर यांच्या हजेरीमुळे उलटसुलट चर्चा सुरू होत आहे.