कर्जाच्या नावाखाली फसवणारा अटकेत
By Admin | Published: May 21, 2016 05:09 AM2016-05-21T05:09:49+5:302016-05-21T05:09:49+5:30
कर्ज मिळवून देण्याच्या नावाखाली व्यावसायिकांची आर्थिक फसवणूक करणाऱ्या महाठगाला गुन्हे शाखेने गोरेगाव येथून अटक केली
मुंबई : व्यवसायासाठी कोट्यवधी रुपयांचे कर्ज मिळवून देण्याच्या नावाखाली व्यावसायिकांची आर्थिक फसवणूक करणाऱ्या महाठगाला गुन्हे शाखेने गोरेगाव येथून अटक केली आहे. या ठगाने अनेकांची फसवणूक केली असल्याचे तपासात समोर येत आहे.
सांगली येथील शासकीय कंत्राटदार संतोष चौगुले यांची भागीदारीमध्ये एक कंपनी असून त्यांच्या कंपनीला शासनाकडून रस्ते बांधण्याचे काम मिळते. या कंपनीच्या भागीदारांचा व्यवसाय वाढवण्यासाठी मोठ्या प्रमाणात पैशांची गरज होती. दरम्यान, या भागीदारांपैकी एकाची ओळख करणसिंग चौहान याच्यासोबत होती. मुंबईतील गोरेगाव येथे राहणारा करणसिंग चौहान याच्याकडे या भागीदारांनी संपर्क साधून कर्ज काढण्याबाबत चर्चा केली़ २५ कोटी रुपयांचे कर्ज मिळवून देण्याचे आमिष त्याने दाखवले. मात्र यावर २ टक्के कमिशन देण्याचे सांगितले. कंत्राटदार असलेल्या संतोष चौगुले आणि भागीदाराने कंपनीची सर्व कागदपत्रे चौहानकडे सोपवली. याबाबत अंधेरी न्यायालयात करार करण्यात आला. या करारादरम्यान चौगुले यांनी चौहानला पुढच्या तारखेचे ९ धनादेश दिले होते. चौहान या महाठगाने चौगुले यांनी दिलेल्या धनादेशांवरील तारखांमध्ये फेरफार करून ते धनादेश वटवून ५० लाख रुपये काढून घेतले.
कर्जाचे काम होत नसल्याने त्यांच्या भागीदाराने चौहानकडे चौकशी केली असता तो त्यांना टाळू लागला होता. अखेर आपली फसवणूक होत असल्याचे लक्षात येताच कंत्राटदार संतोष चौगुले यांनी तक्रार दाखल केली होती. आरोपी गोरेगाव येथे येणार असल्याची माहिती गुन्हे शाखा कक्ष १चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष बागवे यांना मिळाली. या प्रकरणी गुन्हे शाखेने सापळा रचून चौहानला अटक केली.
चौहान याने यापूर्वीदेखील पुणे, मुंबईसह नाशिक, ठाणे या ठिकाणी याप्रकारे अनेकांची फसवणूक केली असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष बागवे यांनी दिली.