भ्रमनिरास : शाळांमध्ये अपेक्षित उपक्रम राबविण्याकडे सर्वांचेच दुर्लक्ष ‘विद्यार्थी दिन’ निव्वळ औपचारिकता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 11, 2017 01:14 AM2017-11-11T01:14:24+5:302017-11-11T01:15:38+5:30
७ नोव्हेंबर १९०० या दिवशी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी प्रथम शाळेत प्रवेश घेतला तो दिवस राज्यात ‘विद्यार्थी दिवस’ म्हणून साजरा करण्यात यावा, असे आदेश शासनाच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने काढले होते.
नाशिक : ७ नोव्हेंबर १९०० या दिवशी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी प्रथम शाळेत प्रवेश घेतला तो दिवस राज्यात ‘विद्यार्थी दिवस’ म्हणून साजरा करण्यात यावा, असे आदेश शासनाच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने काढले होते. त्यानुसार सदर दिवस साजरा करण्यात आलाही मात्र जे उपक्रम राबविणे अपेक्षित होते त्याकडे शाळांनी दुर्लक्ष केल्यामुळे ‘विद्यार्थी दिवस’ साजरा करण्याची निव्वळ औपचारिकता शाळांनी पूर्ण केली असेच काहीसे चित्र शहरात दिसून आले.
महाराष्टÑ शासनाने ७ नोव्हेंबर हा दिवस विद्यार्थी दिवस म्हणून साजरा करावा, असे आदेश शाळांना २७ आॅक्टोबर रोजीच दिले होते. देशाचे संविधान निर्माते असलेल्या डॉ. आंबेडकर यांच्या शालेय जीवनाविषयी विद्यार्थ्यांना माहिती असावी आणि त्यांचे जीवनमूल्ये विद्यार्थ्यांना कळावित यासाठी शासनाने विद्यार्थी दिवस साजरा करण्याचे आदेश शाळांना दिले होते. प्रत्येक विद्यार्थी हा देशाचे भविष्य आहे. त्यामुळे आदर्श विद्यार्थी निर्माण होण्यासाठी शिक्षण हेच एकमेव साधन आहे आणि त्यासाठी आवश्यक असलेल्या कठोर परिश्रमाची जाण सर्व विद्यार्थ्यांना व्हावी या उद्देशाने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे चरित्र विद्यार्थ्यांमध्ये रुजविण्यासाठी डॉ. आंबेडकरांचा शाळा प्रवेशाच्या दिवसाचे औचित्य साधण्यात आले आहे. या दिवशी सर्व शाळांमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावर आधारित विविध पैलंूवर निबंध स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा, काव्यवाचन आदी साहित्यिक, सांस्कृतिक उपक्रमांचे आयोजन करावे, अशा सूचना शासनाने आॅक्टोबरमध्येच सर्व शाळांना दिलेल्या होत्या. असे असतानाही शाळांमध्ये अपेक्षित उपक्रम न राबविता केवळ शिक्षकांची भाषणे आणि प्रतिमा पूजन इतकेच कार्यक्रम घेण्यात आल्याचे बोलले जात आहे. यास काही शाळा अपवाद नक्कीच आहेत. परंतु सध्या सुरू असलेल्या सहामाही परीक्षा आणि स्काउट गाइड शिबिरांमुळे शाळांकडून विद्यार्थी दिनाची फारशी दखलच घेण्यात आली नसल्यामुळे केवळ औपचारिकता म्हणून सदर दिवस साजरा करण्यात आला असल्याचे बोलले जात आहे. मराठी माध्यमांच्या शाळांनी निदान प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून विद्यार्थी दिनाचा सन्मान तरी राखला आहे. मात्र इंग्रजी माध्यमांच्या शाळांकडून अपेक्षित कार्यक्रम राबविण्यात आले नाहीच शिवाय एकाच सत्रात अभिवादन कार्यक्रम करण्यात आल्याचीही चर्चा आहे.