शाळांमध्ये निर्जंतुकीकरण, स्वच्छतेच्या कामांना वेग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 2, 2021 04:12 AM2021-01-02T04:12:58+5:302021-01-02T04:12:58+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नाशिक : शहरासह जिल्ह्यातही कोरोनाचा प्रभाव कमी होत असल्यामुळे जिल्हा प्रशासनाने शासनाच्या सूचनेनुसार, सोमवार (दि. ...
लोकमत न्यूज नेटवर्क
नाशिक : शहरासह जिल्ह्यातही कोरोनाचा प्रभाव कमी होत असल्यामुळे जिल्हा प्रशासनाने शासनाच्या सूचनेनुसार, सोमवार (दि. ४)पासून नववी ते बारावीचे वर्ग सुरू करण्याची तयारी केली आहे. या संदर्भात शाळांनाही वर्गखोल्या व शाळेचा परिसर स्वच्छ करण्यास सांगण्यात आले असून, त्यानुसार नाशिक शहरासह जिल्ह्याभरातील शाळांमध्ये निर्जंतुकीकरण व साफसफाईचे काम वेगाने सुरू आहे. नाशिक शहरातील शहरातील २०६ शाळांसह जिल्हाभरातील १,३२४ शाळांमध्ये नववी ते बारावीचे वर्ग सुरू होणार असून, प्रत्येक विद्यार्थ्यांची थर्मल गनने तपासणी केली जाणार आहे. नाशिक महापालिका क्षेत्रासह जिल्हा परिषदेच्या कार्यक्षेत्रात माध्यमिक शाळांमध्ये ४ जानेवारीपासून नववी ते बारावीचे नियमित वर्ग सुरू करण्याचा निर्णय शिक्षण विभागाने घेतला आहे. त्यासाठी महापालिका परिसरातील शाळांमधील शिक्षकांची २६ डिसेंबरपासून, तर जिल्हा परिषद परिसरातील शिक्षकांची २८ डिसेंबरपासून कोरोना तपासणीही करण्यात येत असून, शाळा सुरू करण्याच्या हलचालींना आता वेग आला आहे. शाळेत विद्यार्थ्यांना पालकांच्या हमीपत्रासह ऐच्छिक प्रवेश देऊन फिजिकल डिस्टन्ससह कोरोनाच्या प्रतिबंधात्मक उपाययोजना करून, जिल्हाभरातील १,३२४ शाळांमध्ये नववी ते बारावीचे वर्ग सुरू होणार आहे.
इन्फो-
महापालिकेने नियमावली जाहीर केली असून, एका वर्गातील एकूण विद्यार्थी संख्येच्या निम्मेच विद्यार्थी शाळेत येणार आहे, तर जे विद्यार्थी शाळेत येऊ शकणार नाही, त्यांचे शिक्षण ऑनलाइन पद्धतीने सुरू राहणार आहे. दिवाळीनंतर २२ नोव्हेंबरपासून शाळा सुरू करण्याचा निर्णय शासनाने घेतला होता. मात्र, या काळात कोरोना रुग्णांची संख्या वाढू लागल्याने शाळा सुरू करण्याचा निर्णय पुढे ढकलण्यात आला. आता शहरातील रुग्णसंख्या कमी झाल्याने ४ जानेवारीपासून नववी ते बारावीपर्यंतचे वर्ग सुरू करण्याचा निर्णय जिल्हा प्रशासनाने घेतला आहे. पुढील काळात २८ फेब्रुवारीपासून सर्वच शाळा सुरू करण्याचे शिक्षण विभागाचे नियोजन असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे.
आरफोटो- ०१स्कूल क्लिनिंग न्यू मराठा हायस्कूलमध्ये शाळेचा परिसर व वर्गखोल्यांची स्वच्छता व निर्जंतुकीकरण करताना शाळेचे कर्मचारी.