श्री क्षेत्र नस्तनपूर येथील शनिमंदिराचे निर्गंतुकीकरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 16, 2020 12:31 AM2020-11-16T00:31:29+5:302020-11-16T00:31:51+5:30
‘मिशन बिगीन अगेन’ अंतर्गत सोमवारपासून (दि.१६) मंदिरे उघडण्यात येणार असल्याच्या पार्श्वभूमीवर श्री क्षेत्र नस्तनपूर येथील शनिमंदिरात भाविकांना जाऊन शनिदेवाचे दर्शन घेणे आता शक्य होणार आहे, अशी माहिती देवस्थानचे प्रमुख विश्वस्त माजी आमदार ॲड. अनिल आहेर यांनी दिली.
नांदगाव : ‘मिशन बिगीन अगेन’ अंतर्गत सोमवारपासून (दि.१६) मंदिरे उघडण्यात येणार असल्याच्या पार्श्वभूमीवर श्री क्षेत्र नस्तनपूर येथील शनिमंदिरात भाविकांना जाऊन शनिदेवाचे दर्शन घेणे आता शक्य होणार आहे, अशी माहिती देवस्थानचे प्रमुख विश्वस्त माजी आमदार ॲड. अनिल आहेर यांनी दिली.
रविवारी (दि.१५) श्री क्षेत्र नस्तनपूर मंदिर परिसराला रासायनिक फवारणी करून निर्जंतुक करण्यात आले. साथीच्या संबंधातील आरोग्य विभागाच्या निर्देशाचे काटेकोर पालन करीत भाविकांना मंदिरात प्रवेश दिला जाणार असून, सॅनेटायझरचा वापर व मास्क सक्तीचे असून, भाविकांना गाभाऱ्यात प्रवेश दिल्यानंतर चौथऱ्यावर तसेच पादुकांना हात लावता येणार नाही. विशिष्ट संकेत पाळूनच शनिमंदिरातील दर्शनाची सुविधा असणार आहे. त्यामुळे शनिभक्तांनी देवस्थानाला सहकार्य करावे, असे आवाहन आहेर यांनी केले आहे.
धार्मिक पर्यटनाच्या नकाशावर असलेल्या श्री क्षेत्र नस्तनपूर येथील शनिमंदिरात खान्देश, मराठवाडासह राज्य-देशातून लाखोंच्या संख्येने श्रद्धाळू भाविकांची असणारी गर्दी कोरोना प्रादुभावामुळे ओसरली होती. मंदिरे खुली होणार असल्याने परिसरात पुन्हा भाविकांची रेलचेल वाढणार आहे.