लासलगावी अत्तर फवारणी यंत्राद्वारे निर्जंतुकीकरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 14, 2020 11:19 PM2020-04-14T23:19:45+5:302020-04-15T00:01:58+5:30
कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून अनेक उपाययोजना केल्या जात आहेत. लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कांदा बाजार आवाराच्या प्रवेशद्वारावरही आता लग्नाच्या स्वागत मंडपात असलेल्या अत्तराच्या फवारणी यंत्राद्वारे सॅनिटायझर फवारून निर्जंतुकीकरण केले जात आहे.
लासलगाव : कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून अनेक उपाययोजना केल्या जात आहेत. लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कांदा बाजार आवाराच्या प्रवेशद्वारावरही आता लग्नाच्या स्वागत मंडपात असलेल्या अत्तराच्या फवारणी यंत्राद्वारे सॅनिटायझर फवारून निर्जंतुकीकरण केले जात आहे.
लासलगाव बाजार समितीतून आवारावर दररोज हजारो वाहनातून कांदा लिलावासाठी येतात. त्यामुळे याठिकाणी व्यापारी, कांदा उत्पादक शेतकरी, हमाल, मापारी आणि बाजार समितीचे कर्मचारी वर्ग या सर्वांची मोठी गर्दी असते. त्यामुळे कोरोना विषाणूंची लागण कोणत्याही घटकाला होऊ नये यासाठी बाजार समितीच्या वतीने सॅनिटायझर फवारणी मशीनद्वारे सुरू केले आहे. या फवारणीसाठी चक्क लग्नकार्यामध्ये मंडपाच्या मुख्य प्रवेशद्वारावर वापरले जाणारे अत्तर फवारणी मशीन वापरण्यात आले आहे. सध्या एका मशीनद्वारे प्रायोगिक तत्त्वावर याची चाचणी घेण्यात आली आहे. त्यानंतर लवकरच या मशीनची संख्या वाढवून माणसांसह येणारी-जाणारी वाहनेसुद्धा निर्जंतुकीकरण केली जाणार आहे. यामुळे कांद्याचे लिलाव सुरळीत सुरू राहण्यासाठी मोठी मदत होणार असल्याचे बाजार समिती प्रशासनाने सांगितले.