भारिपची कार्यकारिणी बरखास्त
By Admin | Published: June 19, 2014 12:17 AM2014-06-19T00:17:23+5:302014-06-19T00:56:11+5:30
भारिपचे प्रदेशाध्यक्ष ज. वि. पवार यांनी भारिपची नाशिक जिल्हा कार्यकारिणी बरखास्त करण्याचा निर्णय नाशिक : उच्चस्तरीय बैठकीत घेण्यात आल्याची माहिती पत्रकाद्वारे दिली आहे.
नाशिक : लोकसभा निवडणुकीपासून पक्षाची भूमिका आणि स्थानिक पदाधिकाऱ्यांचे अधिकार याविषयी धुसफूस आणि नाराजी असल्याने गेल्या काही दिवसांपासून नाशिक जिल्ह्यातील पक्षाचे कामकाज थांबले असतानाच आता भारिपचे प्रदेशाध्यक्ष ज. वि. पवार यांनी भारिपची नाशिक जिल्हा कार्यकारिणी बरखास्त करण्याचा निर्णय उच्चस्तरीय बैठकीत घेण्यात आल्याची माहिती पत्रकाद्वारे दिली आहे.
लोकसभा निवडणुकीत पक्षाची भूमिका आणि स्थानिक पदाधिकाऱ्यांचे अधिकार याविषयी पक्षात अंतर्गत दोन मतप्रवाह होते. त्यातूनच स्थानिक पातळीवर उमेदवारांची निवड करणे, काहींना पक्षातून काढून टाकणे आणि परस्पर उमेदवारी घोषित करणे या साऱ्या प्रकारामुळे पक्षातील मतभेद चव्हाट्यावर आले होते. पक्षात ज्येष्ठ आणि नवे असा वादही रंगला; मात्र त्याचा नंतर इन्कारही करण्यात आला. त्यानंतर माध्यंतरी प्रदेशाध्यक्षांनीच जिल्ह्यातील महिला कार्यकारिणीला बैठकीस बोलावून जिल्हा कार्यकारिणीला टाळले होते. त्याचवेळी झालेल्या बैठकीत नाशिक जिल्हा कार्यकारिणी बरखास्तीवर शिक्कामोर्तब झाले असल्याची चर्चा होती.
तथापि, जिल्हा कार्यकारिणीने असा कोणताही प्रकार झाला नसल्याची भूमिका घेतली होती. त्यानंतर पक्षाचे एकूणच कामकाज थांबल्याने आणि प्रदेश पातळीवरून कोणताही आदेश नसल्यामुळे गेल्या काही दिवसांपासून जिल्हा कार्यकारिणीच्या अस्तित्वाचाही प्रश्न निर्माण झाला होता. आता प्रदेशाध्यक्षांनी थेट जिल्हा कार्यकारिणी बरखास्त करण्यात आले असल्याचे जाहीर केले आहे.
लोकसभा निवडणुकीनंतर जिल्हा कार्यकारिणीला पक्षाकडून कोणतेही सहकार्य मिळेनासे झाल्याचा आरोप आता होऊ लागला आहे. शिवाय ऐन निवडणुकीतही स्थानिक पदाधिकाऱ्यांऐवजी अकोल्यातील आमदाराने नाशिकमध्ये येऊन पक्षाची भूमिका जाहिर केल्यामुळे तर नाराजी अधिकच पसरली होती. त्यामुळे स्थानिक कार्यकर्त्यांमध्ये नाराजी होती तर काहींनी कामकाज करणेही थांबविले होते. आता पक्षानेच कार्यकारिणी बरखास्तीचे पत्रक काढल्याने नव्या कार्यकारिणीत कोण असेल आणि जून्या कार्यकारिणीची भूमिका कोणती असेल, त्यांची भूमिकाही महत्वाची ठरणार आहे. (प्रतिनिधी)