महापालिकेचा अपेक्षाभंग : मुख्यमंत्र्यांसमवेत बैठक
By admin | Published: May 28, 2017 09:51 PM2017-05-28T21:51:49+5:302017-05-28T21:51:49+5:30
शहर दत्तक घेणाऱ्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून भरघोस अशा आर्थिक मदतीची आशा बाळगून असलेल्या नाशिक महापालिकेचा अपेक्षाभंग
नाशिक : शहर दत्तक घेणाऱ्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून भरघोस अशा आर्थिक मदतीची आशा बाळगून असलेल्या नाशिक महापालिकेचा अपेक्षाभंग झाला. महापालिकेत मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत कोणतीही ठोस घोषणा झाली नाही, उलट महापालिकेने आपल्या गरजा आपणच कशा भागविल्या पाहिजे, याबाबत काही उदाहरणांच्या माध्यमातून सल्ला दिला गेला. दरम्यान, महापालिकेने तयार केलेल्या काही कार्ययोजनांमध्ये महापालिका व राज्य सरकारचा हिस्सा जाऊन जो काही निधी लागेल, तो उपलब्ध करून देण्याचे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिले. मात्र, नोकरभरतीचा प्रस्ताव फेटाळून लावत त्यांनी केवळ तांत्रिक पदांनाच मान्यता देण्याचे स्पष्ट केले.
नाशिक महापालिकेतील स्थायी समितीच्या सभागृहात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत बैठक झाली. यावेळी महापालिकेकडून आयुक्त अभिषेक कृष्ण यांनी विविध प्रकल्पांसाठी २१७३ कोटी रुपयांच्या आराखड्याचे सादरीकरण केले. यावेळी कॉँग्रेस गटनेता शाहू खैरे, शिवसेना गटनेता विलास शिंदे व राष्ट्रवादीचे गटनेते गजानन शेलार यांनी काही मुद्दे मांडले. बैठकीनंतर आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले, महापालिकेला घनकचरा व्यवस्थापन, सांडपाणी व्यवस्थापन, पिण्याचे पाणी आणि वाहतूक व्यवस्था या चार बाबींवर लक्ष केंद्रित करण्यास सांगण्यात आले आहे. बैठकीत गोदावरी संवर्धनावरही चर्चा झालेली आहे.