न पाठविलेला ठराव विखंडणाचा आग्रह
By admin | Published: December 14, 2015 11:53 PM2015-12-14T23:53:04+5:302015-12-14T23:56:23+5:30
स्मार्ट सिटी : सत्ताधाऱ्यांनी उडविली भाजपाची खिल्ली
नाशिक : स्मार्ट सिटी योजनेंतर्गत ‘एसपीव्ही’वगळून महापालिकेने ठराव प्रशासनाला पाठविल्याने तो विखंडित करण्याचा आग्रह स्थानिक भाजपा आमदारांनी नागपूरला हिवाळी अधिवेशनाप्रसंगी मुख्यमंत्र्यांकडे धरला; परंतु अद्याप कोणताही ठराव प्रशासनाला पाठविला गेलाच नसल्याने तो विखंडणासाठी आग्रह धरणाऱ्या भाजपा आमदारांची खिल्ली सत्ताधारी मनसेसह अन्य पक्षांनी उडविली. दरम्यान, महापालिकेने सायंकाळी अटीशर्ती टाकून ठराव प्रशासनाला पाठविल्याने भाजपा आमदारांचे ठराव विखंडणाचे प्रयत्न व्यर्थ ठरले.
स्मार्ट सिटीअंतर्गत ‘एसपीव्ही’ वगळून महापौरांनी महासभेचा ठराव शुक्रवारीच प्रशासनाला पाठविला होता. त्याला नगरसचिव विभागाने दुजोराही दिला होता. त्यानुसार, नागपूर येथे हिवाळी अधिवेशन सुरू असल्याने भाजपाचे आमदार देवयानी फरांदे, सीमा हिरे, बाळासाहेब सानप, राहुल अहेर आणि अपूर्व हिरे यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन कलम ४५१ अन्वये सदरचा ठराव विखंडित करून एसपीव्हीसह स्मार्ट सिटीच्या प्रस्तावाला मंजुरी देण्याचा आग्रह धरला. एसपीव्ही वगळून स्मार्ट सिटीचे स्वप्न पूर्ण होऊ शकत नाही. महापालिकेची महासभा ही सार्वभौम असते आणि तिचे अधिकार राज्य अथवा केंद्र सरकार हिरावून घेऊ शकत नाही. महासभेत केवळ दोन सदस्यांनीच चुकीच्या माहितीच्या आधारे विरोध दर्शविला होता, तर अन्य सदस्यांनी करवाढीला विरोध दर्शवित स्मार्ट सिटीचे समर्थन केले आहे. परंतु पीठासन अधिकारी असलेल्या महापौरांनी निर्णय देताना बहुमताचा कौल लक्षात न घेता दोन सदस्यांच्या विरोधाच्या आधारावर कौल देत जनमताचा अनादर केला आहे. त्यामुळे सदर ठराव विखंडित करण्याची मागणी मुख्यमंत्र्यांकडे केली. यावेळी मुख्यमंत्र्यांनी त्यास सकारात्मक प्रतिसाद दिल्याचे भाजपा आमदारांनी म्हटले आहे, परंतु सदर ठराव प्रशासनाला अद्याप रवानाच झाला नसताना त्याच्या विखंडणाचा आग्रह धरणाऱ्या भाजपा आमदारांच्या भूमिकेची सत्ताधारी मनसेसह अन्य पक्षांच्या पदाधिकाऱ्यांनी खिल्ली उडविली. भाजपा आमदारांना प्रसिद्धीची अतिघाई झाल्याचाही टोला एका पदाधिकाऱ्याने लगावला.