महापालिका आयुक्त तुकाराम मुंढेंकडून आचारसंहितेचा भंग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 24, 2018 01:33 AM2018-04-24T01:33:19+5:302018-04-24T01:33:19+5:30

Dismissing the code of conduct from Municipal Commissioner Tukaram Mundhe | महापालिका आयुक्त तुकाराम मुंढेंकडून आचारसंहितेचा भंग

महापालिका आयुक्त तुकाराम मुंढेंकडून आचारसंहितेचा भंग

Next

नाशिक : महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांनी महासभा आणि स्थायी समितीचे अधिकार डावलून करवाढीचा निर्णय घेतल्याबद्दल महासभेत सदस्यांनी तीव्र आक्षेप घेतला आणि प्रभाग क्रमांक १३ च्या पोटनिवडणुकीच्या वेळी करवाढीचा अध्यादेश जारी करत आदर्श आचारसंहितेचा भंगही केल्याने त्यांच्याविरुद्ध निवडणूक आयोगाकडे तक्रार करण्याची मागणी केली. दरम्यान, आचारसंहितेचा भंग झाला किंवा नाही, याबाबत प्रशासनातील अधिकाऱ्यांची उत्तरे देताना मात्र भंबेरी उडाली.  आयुक्त तुकाराम मुंढे यांनी बेकायदेशीरपणे करवाढ लागू केल्याचा सूर सभागृहात उमटला. यावेळी, अनेकांनी कायद्यातील कलम आणि तरतुदी निदर्शनास आणून देत करवाढीचा अधिकार हा आयुक्तांचा नसून तो महासभा व स्थायी समितीचाच असल्याचे ठणकावून सांगितले. कायदेशीर बाबींचा ऊहापोह सुरू असतानाच शिवसेनेचे नगरसेवक सुधाकर बडगुजर यांनी मात्र, आयुक्तांकडून आचारसंहितेचा भंग झाल्याचा आरोप केल्याने चर्चेला कलाटणी मिळाली. बडगुजर यांनी सांगितले, आयुक्तांनी दि. ३१ मार्च २०१८ रोजी करवाढीसंंबंधीचा अध्यादेश जारी केला. त्यावेळी, प्रभाग क्रमांक १३ मधील पोटनिवडणुकीची आचारसंहिता लागू होती. आचारसंहिता लागू असताना असा निर्णय घेणे योग्य आहे काय, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. बडगुजर यांनी प्रशासनाने याबाबत स्पष्टीकरण द्यावे, अशी मागणी पीठासन अधिकाºयाकडे केली. महापौरांनी पोटनिवडणुकीसाठी नियुक्त निवडणूक अधिकारी रोहिदास बहिरम त्याबाबत स्पष्टीकरण देण्याचे आदेश दिले. बहिरम यांनी याबाबत मी भाष्य करणे योग्य होणार नसल्याचे सांगत मान सोडवून घेण्याचा प्रयत्न केला. परंतु, दि. १३ मार्च ते ९ एप्रिल या कालावधीत आचारसंहिता लागू होती, हे स्पष्ट केले. यावेळी, महापौरांनी अतिरिक्त आयुक्त रमेश पवार यांना स्पष्टीकरण देण्याचे सांगितले असता पवार यांनीही सदर आचारसंहिता ही त्या प्रभागापुरता असल्याचे नमूद केले. अखेर मुख्य लेखा परीक्षक व प्रभारी प्रशासन उपआयुक्त महेश बच्छाव यांच्याकडून स्पष्टीकरण मागविले. परंतु, बच्छाव यांनीही या क्षणाला आपण उत्तर देऊ शकत नसल्याचे सांगत वेळ मारून नेण्याचा प्रयत्न केला. महापौरांनी याबाबतचा स्पष्ट खुलासा होईपर्यंत महासभा सुरूच राहील, अशी भूमिका घेतल्याने महेश बच्छाव यांनी बाहेर जाऊन निवडणूक शाखेशी चर्चा केली आणि आचारसंहितेचा भंग झाला नसल्याचे सभागृहात येऊन सांगितले. सदस्यांनी प्रशासनाला धारेवर धरल्याने अधिकाºयांची मात्र पुरती भंबेरी उडाली.

Web Title: Dismissing the code of conduct from Municipal Commissioner Tukaram Mundhe

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.