अभियंता बेपत्ता होण्याच्या घटनेमुळे मनपा कर्मचाऱ्यांमध्ये अस्वस्थता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 29, 2018 12:53 AM2018-05-29T00:53:21+5:302018-05-29T00:53:21+5:30
कामाच्या अतिताणामुळे नगररचना विभागातील सहायक अभियंता रवींद्र पाटील यांनी जीवन संपविण्याची चिठ्ठी लिहून बेपत्ता होण्याच्या घटनेमुळे महापालिकेतील अधिकारी व कर्मचारी वर्गात कमालीची अस्वस्थता निर्माण झाली आहे. रवि पाटील प्रकरणानंतर महापालिकेत गेल्या साडेतीन महिन्यांपासून निर्माण झालेल्या ताण-तणावाला आता सोशल मीडियाच्या माध्यमातून वाट मोकळी करून दिली जात आहे. दरम्यान, या साºया प्रकरणात कर्मचारी संघटनांची बोटचेपी भूमिकाही संशयास्पद ठरत असून, कर्मचारी उघडपणे संघटनांच्या मुखंडांबाबत नाराजीचा सूर प्रकट करू लागले आहेत.
नाशिक : कामाच्या अतिताणामुळे नगररचना विभागातील सहायक अभियंता रवींद्र पाटील यांनी जीवन संपविण्याची चिठ्ठी लिहून बेपत्ता होण्याच्या घटनेमुळे महापालिकेतील अधिकारी व कर्मचारी वर्गात कमालीची अस्वस्थता निर्माण झाली आहे. रवि पाटील प्रकरणानंतर महापालिकेत गेल्या साडेतीन महिन्यांपासून निर्माण झालेल्या ताण-तणावाला आता सोशल मीडियाच्या माध्यमातून वाट मोकळी करून दिली जात आहे. दरम्यान, या साºया प्रकरणात कर्मचारी संघटनांची बोटचेपी भूमिकाही संशयास्पद ठरत असून, कर्मचारी उघडपणे संघटनांच्या मुखंडांबाबत नाराजीचा सूर प्रकट करू लागले आहेत. गेल्या शनिवारी (दि.२६) आयुक्तांच्या ‘वॉक विथ कमिशनर’ या उपक्रमासाठी जातो, असे सांगून घरातून गेलेले नगररचना विभागातील सहायक अभियंता रवींद्र पाटील बेपत्ता झाले. त्यांच्या वाहनात सापडलेल्या चिठ्ठीत त्यांनी आपण नोकरीच्या ठिकाणी कामाच्या अतिताणामुळे जीवन संपवत असल्याचे स्पष्ट केल्याने पोलिसांनी तपासाची दिशा बदलली आहे. पाटील बेपत्ता होऊन तीन दिवस उलटले तरी अद्याप त्यांचा ठावठिकाणा लागलेला नाही. त्यामुळे पाटील कुटुंबीय चिंतित असतानाच या प्रकरणामुळे महापालिका अधिकारी व कर्मचारी यांच्यातही कमालीची अस्वस्थता पसरली आहे. गेल्या तीन-साडेतीन महिन्यांपासून महापालिकेत अधिकारी व कर्मचारी यांना सुट्या माहीत नसल्याचे सांगितले जात आहे. रात्री ९ ते १० वाजेपर्यंत कामकाज करावे लागत असल्याच्याही तक्रारी ऐकायला मिळत आहेत. महापालिकेने एनएमसी ई-कनेक्ट हे मोबाइल अॅप विकसित केले असले तरी त्यावर तक्रारींची वाढती संख्या आणि त्यांचा निपटरा करण्यासाठी मिळणारी मुदत यात तफावत असल्याने अनेकांना ताणतणावाने घेरल्याची चर्चा आहे. बºयाचशा तक्रारी या व्यक्तिगत भांडण-वादातून मांडल्या जात आहेत. त्यामुळे संबंधित तक्रारींची शहानिशा करण्यापासून ते त्यावर करावयाच्या कारवाईचा तपशील सादर करताना अधिकारी व कर्मचारी वर्गात दमछाक होताना दिसून येत आहे. महापालिकेत अगोदरच कर्मचारी संख्या कमी आहे. त्यात अनेकांकडे प्रभारी व अतिरिक्त कामाचा कार्यभार सोपविण्यात आला आहे. त्यामुळे ताणतणावाच्या अशा स्थितीत अनेकांवर निलंबनाची, वेतनवाढ रोखण्याच्या कारवाईची टांगती तलवार आहे. महापालिकेत रवि पाटील प्रकरणाची पुनरावृत्ती होऊ नये, अशी प्रार्थना आता केली जाऊ लागली आहे. दरम्यान, महापालिकेत म्युनिसिपल कर्मचारी कामगार संघटना, सीटू व मनसेप्रणीत संघटना, वाहनचालकांची संघटना कार्यरत आहेत. मात्र, संबंधित संघटनांकडून सदर प्रकरणाबाबत बोटचेपी भूमिका घेतली जात असल्याने कर्मचारी वर्गात संघटनांच्या पदाधिकाºयांविरुद्ध नाराजीचा सूर उमटत आहे.
सोशल मीडियातून संवेदना
सहायक अभियंता रवींद्र पाटील यांच्या बेपत्ता होण्याच्या घटनेनंतर आता मनपातील कर्मचारी वर्गातून सोशल मीडियातून आपल्या संवेदना व्यक्त केल्या जात आहेत. सहायक अभियंता रवि पाटील हिटलरशाहीचा बळी?, ‘मनपा की मौत का कुवा’, ‘छोड तू रवि..तू वापस आ...!’ अशा शीर्षकाखाली सोशल मीडियातून महापालिकेतील कारभाराचे दर्शन घडविले जाऊ लागले आहे. तीन दिवस उलटूनही रवींद्र पाटील यांचा ठावठिकाणा न लागल्याने महापालिका अधिकारी व कर्मचारी वर्गात अस्वस्थता आहे. शांत स्वभावाच्या रविकडून टोकाचे पाऊल उचलले गेल्याबद्दल अनेकांनी आश्चर्यही व्यक्त केले आहे.