दोघा महिलांना अटक: निराश्रीत अल्पवयीन मुलीला ढकलले देहविक्रयच्या व्यवसायात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 4, 2020 07:39 PM2020-07-04T19:39:24+5:302020-07-04T19:44:48+5:30
नाशिक : शहर व परिसरात विनयभंग, बलात्कारांसारख्या गुन्ह्यांमध्ये मागील काही दिवसांपासून वाढ झाली आहे. पंचशीलनगर येथील काही महिला व ...
नाशिक : शहर व परिसरात विनयभंग, बलात्कारांसारख्या गुन्ह्यांमध्ये मागील काही दिवसांपासून वाढ झाली आहे. पंचशीलनगर येथील काही महिला व पुरूषांनी मिळून पिडित एका अल्पवयीन निराश्रीत मुलीला फूस लावून जेवणात गुंगीचे औषध देवून तिच्याशी बळजबरीने शारिरिक संबंध प्रस्थापित केले. तसेच तीच्याकडून देहविक्रयचा व्यवसायदेखील करून घेतल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.
एका अल्पवयीन निराश्रित मुलीच्या मजबुरीचा गैरफायदा घेत गंजमाळ पंचशीलनगरमधील मुख्य संशयित आरोपी आलिशा उर्फ सुलताना व सज्जो या दोघींनी तिला आमच्या मुलीप्रमाणे सांभाळू असे सांगून आधार देण्याचा प्रयत्न केला. १ सप्टेंबर२०१९ पासून तर थेट १जुलै २०२० या कालावधीत तिच्याकडून बळजबरीने देहविक्रयचा व्यवसाय करून घेत पैसेदेखील कमविल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पिडित मुलीने या दोघी महिलांच्या तावडीतून कशीबशी आपली सुटका करून घेत थेट भद्रकाली पोलीस ठाणे गाठून आपबिती सांगितली. तिच्यासोबत झालेला अन्याय व अत्याचाराचा प्रसंगाने पोलिसांनाही हादरवले. दोघी संशयित महिलांनी पिडित मुलीला गुंगीचे औषध जेवणातून देत संशयित गणेश, आकडेवाडा, जयेश जाधव यांच्यामार्फत तिच्यावर बलात्कार घडवून आणला आणि मोबाईलद्वारे चित्रीकरण करत त्यानुसार पिडित मुलीला वारंवार धमकावून ठेवल्याचे तिने फिर्यादीत म्हटले आहे. घटनेनंतर हे तीघे नराधम फरार झाले आहेत. या तीघांनी तिला वेगवेगळ्या दिवशी भिन्न भिन्न ठिकाणी घेऊन जात बळजबरीने शारिरिक संबध निर्माण करत लैंगित अत्याचार केला. तसेच या नराधमांकडून पैसे उकळल्यानंतर आलिशा ऊर्फ सुलताना हिने तीच्या मैत्रिणी सज्जो, शब्बो व मनिषा (पुर्ण नाव, पत्ता माहित नाही) यांच्याकडे देहविक्रय करण्यासाठी बळजबरीने पाठवून दिले. त्यामुळे या महिलांनीसुध्दा वेगवेगळ्या अनोळखी पुरूषांसोबत तिला बळजबरीने शरीरसंबंध ठेवण्यास भाग पाडल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.
दोघी महिला ताब्यात; नराधमांचा शोध सुरू
पोलिसांनी दोघा महिलांना अटक केली असून उर्वरित सर्व संशयितांचा शोध घेत आहे. पिडितेच्या फिर्यादीनुसार सर्व संशयित महिलांसह पुरूषांवर बलात्कार, पोक्सो, अनैतिक व्यापार प्रतिबंध कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नाव व पत्ता अर्धवट असल्यामुळे उर्वतिर संशयितांचा माग काढणे अवघड होत आहे; मात्र लवकरच सर्वांना बेड्या ठोकणार असल्याचा आशावाद तपासी अधिकारी गुन्हे शाखेचे पोलीस निरिक्षक दत्ता पवार यांनी व्यक्त केला.