आमदारांना सोडवेना नगरसेवकपदाचा मोह
By admin | Published: December 22, 2014 12:48 AM2014-12-22T00:48:28+5:302014-12-22T00:48:45+5:30
दोन्ही थडींवर हात : कार्यकर्त्यांना हवी संधी, नवनिर्वाचित आमदारांची चुप्पी; प्रदेशस्तरावरून निर्णयाची प्रतीक्षा
नाशिक : विधिमंडळातील मोठ्या सभागृहात जाण्याची संधी मिळूनही भाजपाचे चार आमदार अजून आपल्या प्रभागातच अडकून पडले असून, दोन महिने उलटून गेल्यानंतरही नगरसेवकपदाचा राजीनामा देण्याबाबत मौन पाळले आहे. आमदार म्हणून निवडून गेले तरी नगरसेवकपद कायम ठेवण्याची परंपरा या चौघाही आमदारांनी पाळण्याचे ठरविलेले दिसते. दोन्ही थडींवर हात ठेवण्याचा हा मोह मात्र संबंधित आमदारांच्या प्रभागातील पक्षकार्यकर्त्यांमध्ये असंतोषाला पूरक ठरत आहे. पक्षपातळीवरूनही संबंधित आमदारांना पद सोडण्याबाबत कुठल्याही हालचाली होताना दिसून येत नसल्याने पक्षाविषयीही नाराजीचा सूर उमटू लागला आहे.
नाशिक महापालिकेतील भाजपाचे नगरसेवक प्रा. देवयानी फरांदे (नाशिक मध्य), सौ. सीमा हिरे (नाशिक पश्चिम), बाळासाहेब सानप (नाशिक पूर्व) आणि डॉ. राहुल अहेर (चांदवड) हे दोन महिन्यांपूर्वी झालेल्या विधानसभा निवडणुकीत विजयी झाले. भाजपाचे हे चारही नगरसेवक महापालिकेतून विधानसभेवर निवडून गेल्यानंतर ते नगरसेवकपदाचा राजीनामा देतील आणि त्यांच्या रिक्त होणाऱ्या जागेवर पोटनिवडणूक होऊन संधी मिळेल या अपेक्षेने भाजपातीलच काही कार्यकर्ते कामाला लागले होते. परंतु विधानसभा निवडणूक होऊन दोन महिने लोटले तरी अद्याप या चारही आमदारांनी आपल्या नगरसेवकपदाचा राजीनामा दिलेला नाही आणि त्यासंबंधी जाहीर भूमिकाही प्रदर्शित केली नाही. त्यामुळे स्थानिक पातळीवर संभ्रमावस्था आहे. दोन महिन्यांत महापालिकेच्या झालेल्या महासभांना हे चारही आमदार गैरहजर राहिले. नुकत्याच झालेल्या महासभेच्या वेळी तर नागपूरला विधानसभेचे हिवाळी अधिवेशन सुरू होते. आता केवळ एका छोटेखानी प्रभागाचे नव्हे तर एका विधानसभा मतदारसंघाच्या नेतृत्वाची धुरा सांभाळावी लागणार असल्याने आमदारांचा कामाचा व्यापही वाढणार आहे. अशा स्थितीत त्यांना महापालिकेच्या कामकाजात कितपत स्वारस्य असेल, याबाबत शंकाच आहे. पालिका निवडणुकीत सेना-भाजपा युती नसतानादेखील बाळासाहेब सानप हे प्रभाग क्रमांक ११ मधील सर्वसाधारण जागेवर महापालिकेत निवडून गेले होते. त्यांनी मोठ्या मताधिक्याने एकहाती विजय संपादन केला होता. प्रा. देवयानी फरांदे या प्रभाग १४ मधून ओबीसी महिलांसाठी आरक्षित जागेवर विजयी झाल्या. त्यांनीदेखील मोठे मताधिक्य मिळवित विजय प्राप्त केला होता. प्रभाग १५ मध्ये तर सीमा हिरे यांनी ओबीसी महिला या राखीव जागेवर विजय मिळविला तर याच प्रभागातील दुसऱ्या जागेवर सर्वसाधारण गटातून डॉ. राहुल अहेर यांचा अवघ्या १५९ मतांनी विजय झाला होता. आमदार बनलेल्या या चारही नगरसेवकांनी राजीनामा दिला आणि रिक्त जागांवर पोटनिवडणूक झालीच तर राहुल अहेर वगळता इतरांच्या प्रभागात भाजपाला विजय मिळविणे अवघड नाही; परंतु बदललेली समीकरणे पाहता नामुष्की नको म्हणून बहुधा पक्षपातळीवरही आमदारांच्या राजीनाम्याबाबत मौन पाळले जात असावे. (प्रतिनिधी)