हनुमानाच्या जन्मस्थळाचा वाद ‘वाढता वाढता वाढे’; किष्किंधा मुद्द्यावर गोविंदानंद आक्रमक
By ऑनलाइन लोकमत | Published: June 2, 2022 07:23 AM2022-06-02T07:23:50+5:302022-06-02T07:23:56+5:30
बुधवारी नाशिक सोडताना त्यांनी नाशिककरांना किष्किंधाला दर्शनासाठी येण्याचे निमंत्रण दिले.
नाशिक : रामभक्त हनुमानाचे जन्मस्थळ नाशिकमधील अंजनेरी नसून कर्नाटकातील किष्किंधा असल्याचा दावा करणारे स्वामी गोविंदानंद सरस्वती यांनी दुसऱ्या दिवशीही आक्रमक भूमिका घेत किष्किंधा मुद्द्यावर आपण ठाम असल्याचे सांगितले. अंजनेरीसंदर्भात सादर करण्यात आलेले पुरावे पुरेसे नसल्याचा दावा करीत त्यांना नाशिकमधील साधू महंतांना पुन्हा एकदा आव्हान दिले. दरम्यान, बुधवारी नाशिक सोडताना त्यांनी नाशिककरांना किष्किंधाला दर्शनासाठी येण्याचे निमंत्रण दिले.
हनुमानाच्या जन्मस्थळाचा वाद निर्माण करणाऱ्या गोविंदानंद सरस्वती यांनी मंगळवारी नाशिकमधील धर्मसभेनंतर रात्री उशिरा पुन्हा नाशिकचे साधू, महंत, अभ्यासक यांना आव्हान देत माध्यमांसमेार उत्तर परिषद घेण्याचे जाहीर केले होते. त्यानुसार बुधवारी त्यांनी किष्किंधा मुद्द्यावर ठाम असल्याचे म्हटले आहे. यापूर्वी उत्तर कन्नड येथील गोकर्ण आणि आंध्रमधील तिरुमाला येथील हनुमान जन्मस्थळाचा मुद्दा मिटला असून, आता केवळ नाशिकच्या अंजनेरी येथील जन्मस्थळाचा मुद्दा असून, हा वाददेखील आपण धर्मशास्त्राच्या आधारावर सिद्ध करून दाखवू, असा पुनरुच्चार गोविंदानंद सरस्वती यांनी केला आहे.
करमाळ्यातील कुगावचाही दावा
सोलापूरचे सीताराम महाराज बल्लाळ यांनी पद्मपुराणातील ३३ व्या अध्यायाचा दाखला देत सोलापूरमधील करमाळा तालुक्यातील बॅकवॉटरला असलेले कुगाव (कुर्मगाव) हे हनुमानाचे जन्मस्थळ असल्याचा दावा केला आहे. कुगाव ग्रामपंचायतकडील सर्व पुरावे पुरातन काळातील पौराणिक ग्रंथातील आहेत व भीमामहात्म्य हा एकमेव ग्रंथ ब्रिटिश शासनाच्या काळात रजिस्टर केलेला आहे, असा दावा त्यानी केला आहे.