नेहरू उद्यानाजवळील अतिक्रमणे हटविताना वाद बाचाबाची : पोलीस बंदोबस्तात केली कारवाई पूर्ण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 4, 2018 01:45 AM2018-05-04T01:45:47+5:302018-05-04T01:45:47+5:30
नाशिक : हॉकर्स झोनमध्ये जागा देऊनही तेथे स्थलांतरित न झालेल्या नेहरू उद्यानालगतच्या हातगाडी चालकांविरुध्द महापालिकेने धडक कारवाई करीत त्यांचे साहित्य जप्त केले.
नाशिक : हॉकर्स झोनमध्ये जागा देऊनही तेथे स्थलांतरित न झालेल्या नेहरू उद्यानालगतच्या हातगाडी चालकांविरुध्द महापालिकेने धडक कारवाई करीत त्यांचे साहित्य जप्त केले. यावेळी व्यावसायिकांनी विरोध केल्याने वादही झाले. तथापि, पोलीस बंदोबस्तात ही कारवाई पूर्ण करण्यात आली.
महापालिकेने नेहरू उद्यानालगत असलेल्या या विक्रेत्यांना यापूर्वीच स्थलांतरित होण्यासाठी गंगावाडी, घासबाजार आणि संदीप हॉटेल समोरील मोकळ्या जागेत फेरीवाला क्षेत्रात जागा उपलब्ध करून दिली आहे. परंतु आहे त्याच जागी पुनर्वसन करावे अशी त्यांची मागणी असून त्यामुळेच हे विक्रेते याच ठिकाणी खाद्यपदार्थ विक्रीचा व्यवसाय करीत आहेत. त्यामुळे महापालिकेने गुरुवारी (दि.३) कारवाईचा बडगा उगारला. सायंकाळी मोहीम सुरू होताच विक्रेत्यांनी आरडाओरड करीत विरोध केला. तसेच साहित्य परत मिळवण्यासाठीदेखील धावपळ करीत हुज्जत घातली. परंतु तरीही महापालिकेने कारवाई पूर्ण केली. पश्चिम विभागातील मुंबई नाका ते त्र्यंबक नाका ते सी.बी.एस. ते एम.जी. रोड ते मेहेर सिग्नलपर्यंत रस्त्याच्या दुतर्फा असलेली अनधिकृत अतिक्र मणे, शेड, ओटे, जाळ्या, टपऱ्या, हातगाड्या हटविण्यात आल्या व सुमारे चार ट्रक विविध साहित्य जप्त करून ओझर जकात नाका येथे जमा करण्यात आले.