नांदगावच्या तहसीलदारांकडून ज्येष्ठांची अवहेलना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 1, 2018 04:59 PM2018-10-01T16:59:29+5:302018-10-01T17:02:09+5:30
निषेधाचा सूर : मोर्चेकऱ्यांना अडीच तास तिष्ठत ठेवल्याने संताप
नांदगाव : ज्येष्ठ नागरिक दिनानिमित्त विविध मागण्यांसाठी मोर्चा काढणा-या नांदगावमधील ज्येष्ठ नागरिकांना अवमानित होण्याचा दुर्दैवी प्रसंग ओढवला. ज्येष्ठांशी सन्मानाने वागावे असे स्पष्ट निर्देश शासन स्तरावरून देण्यात आले असतांनाही ज्येष्ठ नागरिक दिनीच नांदगावच्या तहसीलदारांकडून ज्येष्ठांच्या वाट्याला आलेली ही अवहेलना चर्चेचा आणि संतापाचा विषय बनली आहे. नांदगावला बदली झालेल्या व पदभार स्वीकारण्यासाठी नाखूष असलेल्या या तहसीलदारांनी ‘हवं तर माझी बदली करा’ अशी उर्मटपणाची भाषा वापरल्याने निषेधाचा सूर उमटत आहे.
ज्येष्ठांनी आपल्या विविध मागण्यांसाठी तहसील कार्यालयात मोर्चा काढणार असल्याची पूर्व कल्पना दिली होती. त्यानुसार पोलिसांची रीतसर परवानगी घेऊन ज्येष्ठांनी जुन्या तहसील कार्यालयावर मोर्चा काढला. मोर्चाचे निवेदन स्वीकारण्यासाठी तहसील कार्यालयातील कोणताही प्रतिनिधी उपस्थित नव्हता. मोर्चातील ज्येष्ठांनी तहसीलदार भारती सागरे यांना मोर्चाचे निवेदन स्वीकारण्यासाठी येण्याची विनंती केली. परंतु, सागरे यांनी ‘तुमच्यातले चार-पाच जण कार्यालयात या, मी निवेदन स्वीकारेन’, अशी भूमिका स्वीकारली. निवेदन स्वीकारण्यासाठी तहसीलदार येत नसल्याचे पाहून ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष रंगनाथ चव्हाण यांनी येवल्याचे प्रांताधिकारी यांना दूरध्वनी केला व हा ज्येष्ठांचा अवमान असल्याबाबत भावना व्यक्त केल्या. मोर्चा काढल्यानंतर, तहसीलदारांच्या प्रतीक्षेत ज्येष्ठांना उन्हात तब्बल अडीच तासांपेक्षाही अधिक काळ तिष्ठत बसावे लागले. यावेळी बंदोबस्ताला असलेल्या पोलिसांनी मोर्चेकरी व प्रांताधिकारी यांच्या संवादातील कल्पना पोलीस निरीक्षक अनिल भंवारी यांना दिली. भंवारी यांनी या हालचालींची माहिती तहसीलदार सागरे यांना दिल्यानंतर ज्येष्ठांच्या अवमानाचे प्रकरण अंगलट येण्याची शक्यता लक्षात घेऊन तहसीलदारांनी पोलिसांच्या उपस्थितीत अखेर निवेदन स्वीकारले.
बैठा सत्याग्रह
ज्येष्ठांनी आज काढलेल्या मोर्चातील प्रमुख मागण्या तहसील कार्यालयात त्यांना येणा-या अडचणींच्या अनुषंगाने होत्या. ज्येष्ठ नागरीक संघाचे अध्यक्ष रंगनाथ चव्हाण, सौ. कुसुमताई सावंत, वामनदादा पोतदार, सुरेश दंडगव्हाळ, सामाजिक कार्यकर्ते संजय मोकळ, सुरजमल संत, अंबादास पैठणकर यांचेसह ज्येष्ठ नागरिक या मोर्चात सहभागी झाले होते. तहसीलदारांच्या या वर्तणुकीच्या निषेधार्थ मंगळवारी (दि. २) गांधी जयंती दिनी हुतात्मा स्मारकाजवळ बैठा सत्याग्रह करण्याची भूमिका ज्येष्ठांनी घेतली आहे.