परिट समाजाच्या व्यवसायाची विस्कटली घडी!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 9, 2020 11:28 PM2020-04-09T23:28:44+5:302020-04-09T23:28:59+5:30
शुभ्र कांजीच्या कपड्यांची व बागायतदार टोपीची कौशल्याने कडक इस्त्री मारून सुंदर परिट घडी तयार करणाऱ्या जिल्ह्यातील परिट समाजाच्या स्वत:च्या व्यवसायाची घडी आता मात्र कोरोना विषाणूमुळे पुरती विस्कटली आहे. सरकारने या समाजाला विशेष आर्थिक मदत देऊन वीज माफी देण्याची मागणी जिल्ह्यातील परिट-धोबी समाजाने केली आहे.
कसबे-सुकेणे : शुभ्र कांजीच्या कपड्यांची व बागायतदार टोपीची कौशल्याने कडक इस्त्री मारून सुंदर परिट घडी तयार करणाऱ्या जिल्ह्यातील परिट समाजाच्या स्वत:च्या व्यवसायाची घडी आता मात्र कोरोना विषाणूमुळे पुरती विस्कटली आहे. सरकारने या समाजाला विशेष आर्थिक मदत देऊन वीज माफी देण्याची मागणी जिल्ह्यातील परिट-धोबी समाजाने केली आहे.
आपल्या कडक इस्त्रीने समाजातील नोकरदार, शेतकरी बागायतदार ते थेट पुढाऱ्यांचे व्यक्तिमत्त्व खुलविणाºया जिल्ह्यातील परिट समाजाच्या व्यवसायाची घडी लॉकडाउनच्या सतराव्या दिवशी कोरोना विषाणूमुळे पुरती विस्कटली आहे. कोरोना विषाणू संसर्ग प्रादुर्भाव रोखण्यासाठी सुरू असलेल्या लॉकडाउनमुळे नाशिक जिल्ह्यातील लॉन्ड्री व्यवसाय आजमितीला पूर्णत: ठप्प झाला आहे. यंदा लग्नसराई नसल्याने या व्यवसायावर तब्बल सहा महिने लॉकडाउनचा परीणाम होणार आहे. नाशिक शहरासह जिल्ह्यात सुमारे दोन हजारांच्या आसपास लॉन्ड्री व्यावसायिक आहेत. पॉवर लॉन्ड्री, ड्रायक्लिनर्स वर्कशॉप यांनी यंदाच्या हंगामाच्या तोंडावर महागडी कपडे धुण्याचे, वाळविण्याची मशिनरी घेऊन ठेवली आहे, परंतु यंदा लग्नसराई होणार नसल्याने कर्ज काढून घेतलेल्या मशिनरींचे बॅँकांचे कर्ज व त्यावरील व्याज कसे फेडायचे, असा सवाल जिल्ह्यातील परीट समाजाने उपस्थित केला आहे. सर्वात गंभीर परिस्थिती ही लहान लॉन्ड्री व्यावसायिकांची असून भाड्याने घेतलेले गाळा दुकानाचे भाडे, वीजबिल कसे फेडायचे, कौटुंबिक उदरनिर्वाह कसा करायचा हा प्रश्न या समाजासमोर ‘आ’ वासून उभा आहे. साठ टक्के समाज हा लॉन्ड्री व्यवस्थेवर अवलंबून आहे, काही समाजबांधवांनी प्रशासनासमोर व्यथा मांडली आहे, सरकार गांभीर्याने विचार करत नसल्याची खंत यावेळी व्यक्त केली.
दिवसभर इस्त्रीचा धंदा करून तुटपुंज्या पैशांनी चरितार्थ चालविणाºया काही गरीब
परिट समाजाच्या कुटुंबांवर तर अक्षरश: उपासमारीची वेळ आली असल्याचे परिट समाजबांधवांनी सांगितले.
सरकारने परिट समाजाला विशेष साहाय्य करून लॉन्ड्री व्यावसायिकांचे तीन महिन्याचे वीजबिल माफ करावे, जागाभाडे व गाळाभाडे सवलत द्यावी, छोट्या लॉन्ड्रीधारकांच्या पाल्यांच्या शैक्षणिक शुल्कात माफी देण्याची मागणी कसबे सुकेणे येथील अनिल रणशिंगे, लक्ष्मण सगर, राजेंद्र रणशिंगे, दिलीप सगर, नितीन रणशिंगे, ओझरचे श्याम सूर्यवंशी, नंदू आंबेकर, आदेश शिंदे, मनोहर बोराडे, काशीनाथ रणशिंगे, मदन रणशिंगे, उगावचे दिलीप जाधव, पिंपळस रामाचे येथील प्रशांत वाघ, शिंगवेचे रवि सगर, चांदोरीचे किरण वाघ, मंगेश लुंगशे व नाशिक जिल्ह्यातील परिट-धोबी समाजाने केली आहे.
कोरोना विषाणू संसर्ग प्रादुर्भाव रोखण्यासाठी खबरदारी म्हणून सरकारने पुकारलेला लॉकडाउन हा एप्रिल-मे दरम्यान सुरूच राहणार असल्याचे दिसते. परिणामी यंदा लग्नसराई होणार नसल्याने लग्नसराईचे मार्च, एप्रिल आणि मे, तसेच पावसाळ्याचे चार महिने असे एकूण सात महिने या व्यवसायावर मंदीचे सावट राहणार असल्याने जिल्ह्यातील लॉन्ड्री व्यावसायिकांचे धाबे दणाणले आहे. परिट समाजाच्या लॉन्ड्री व्यवसायाला घरपोच सुविधा पुरविण्यास परवानगी द्यावी, लॉन्ड्री व्यवसाय हा सेवा गटात असल्याने लॉन्ड्री व्यावसायिकांना शासनाने मोफत सॅनिटायझर, मास्क पुरवावेत, अशी मागणी जिल्ह्यातील लॉन्ड्री व्यावसायिकांनी केली आहे.