अंबड वसाहतीत दहा तास वीजपुरवठा खंडित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 25, 2017 12:52 AM2017-07-25T00:52:28+5:302017-07-25T00:52:41+5:30
सातपूर : अंबड औद्योगिक वसाहतीत सोमवार तब्बल दहा तास विद्युत पुरवठा खंडित झाल्यामुळे उत्पादन ठप्प झाल्याने उद्योजकांचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले आहे
लोकमत न्यूज नेटवर्क
सातपूर : अंबड औद्योगिक वसाहतीत सोमवार तब्बल दहा तास विद्युत पुरवठा खंडित झाल्यामुळे उत्पादन ठप्प झाल्याने उद्योजकांचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले आहे. वीज वितरण कंपनीच्या या भोंगळ कारभाराविषयी उद्योजकांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे.
सोमवारी पहाटे साडेचार वाजेपासून ते दुपारी दोन वाजेपर्यंत अंबड औद्योगिक वसाहतीतील डब्ल्यू आणि डी सेक्टरमधील विद्युत पुरवठा खंडित झाला होता. याबाबत उद्योजकांनी आयमा पदाधिकाऱ्यांना माहिती देण्यात आल्यानंतर आयमाचे अध्यक्ष राजेंद्र अहिरे, सरचिटणीस निखिल पांचाळ, ऊर्जा समितीचे अध्यक्ष सिद्धार्थ पाटील यांनी विभागीय विद्युत वितरण अधिकाऱ्यांची भेट घेतली. या भागाला विद्युत पुरवठा करणारे पाच फिडर अचानक बंद पडल्याने विद्युत पुरवठा विस्कळीत झाल्याचे संबंधित अधिकाऱ्यांनी आयमा पदाधिकाऱ्यांना सांगितले. आयमा पदाधिकाऱ्यांनी मुख्य अभियंता दीपक कुमठेकर यांच्याशी संपर्क साधून आपल्या संतप्त भावना व्यक्त केल्या, तर कुमठेकर यांनी त्वरित विद्युत पुरवठा सुरळीत करण्याचे निर्देश दिलेत. डब्ल्यू आणि डी सेक्टरमधील विद्युत पुरवठा तब्बल दहा तास खंडित झाल्याने जवळपास अर्धी औद्योगिक वसाहत ठप्प झाली होती. पहिली पाळी बंद ठेवावी लागली होती. त्यामुळे उद्योजकांचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे. त्यात निर्यातदार उत्पादकांना मोठा आर्थिक फटका बसला आहे.