प्रभागांची मोडतोड, मातब्बर येणार आमनेसामने
By admin | Published: October 8, 2016 01:48 AM2016-10-08T01:48:05+5:302016-10-08T01:48:34+5:30
महापालिका निवडणूक : आरक्षणामुळे काही नगरसेवक अडचणीत
नाशिक : फेब्रुवारी २०१७ मध्ये होणाऱ्या नाशिक महापालिका निवडणुकीसाठी ३१ प्रभागांमधील आरक्षित जागांची सोडत शुक्रवारी काढण्यात आली. किमान ३७ ते कमाल ५३ हजार लोकसंख्येचा बनलेला प्रभाग, रचनेमध्ये भौगौलिक क्षेत्राची झालेली मोडतोड, नव्याने जोडण्यात आलेला परिसर आणि काही प्रभागांमध्ये आरक्षणांमुळे अडचणीत सापडलेले अनेक विद्यमान मातब्बर नगरसेवक सर्वसाधारण जागेवर आमनेसामने येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. महापौर, उपमहापौरांसह पदाधिकारी यांचे प्रभाग सुरक्षित राहिले असले तरी काही नगरसेवकांची आरक्षणामुळे कोंडी झाली आहे.
महापालिका निवडणुकीसाठी चार सदस्यीय प्रभागरचना निश्चित करण्यात आल्याने ३१ प्रभागांची निर्मिती करण्यात आली आहे. त्यातील २९ प्रभाग हे चार सदस्यीय तर दोन प्रभाग हे तीन सदस्यांचे असणार आहेत. शुक्रवारी प्रभागांमधील आरक्षित जागांसाठी सोडत काढण्यात आली. याचवेळी प्रभागांची लोकसंख्या, प्रभागाची व्याप्ती व परिसरही जाहीर करण्यात आल्याने महापालिका निवडणुकीचे बिगुल खऱ्या अर्थाने वाजले आहे. सन २०११ च्या जनगणनेनुसार प्रभागांची संख्या निश्चित करण्यात आल्याने ३७ ते ५३ हजार लोकसंख्येचे प्रभाग बनले आहेत. त्यात अनेक प्रभागांची मोडतोड झाली असून, काही भाग नव्यानेही जोडण्यात आलेला आहे. त्यामुळे उमेदवारांची मोठी दमछाक बघायला मिळणार आहे. (पान ६ वर)
पंचवटी विभागात विद्यमान महापौर अशोक मुर्तडक व उपमहापौर गुरुमित बग्गा यांचे प्रभाग सुरक्षित असले तरी नव्याने मोठ्या प्रमाणावर परिसर जोडण्यात आला आहे. शिक्षण मंडळाचे उपसभापती गणेश चव्हाण, शालिनी पवार, विशाल घोलप, रुपाली गावंड, सिंधू खोडे, ज्योती गांगुर्डे यांची आरक्षित जागांमुळे अडचण झाली आहे. त्यांना सुरक्षित प्रभागाचा शोध घ्यावा लागणार आहे. सातपूर विभागात रिपाइंचे जिल्हाध्यक्ष व गटनेते प्रकाश लोंढे यांची पुरती कोंडी झाली आहे. त्यांच्या प्रभाग क्रमांक ११ मध्ये अनुसूचित जाती महिला, अनुसूचित जमाती, ओबीसी आणि सर्वसाधारण महिला असे आरक्षण पडल्याने त्यांना लगतच्या प्रभागाचा आसरा घ्यावा लागणार आहे. विद्यमान स्थायी समितीचे सभापती सलीम शेख, माजी सभागृहनेते शशिकांत जाधव, विलास शिंदे, विक्रांत मते, सचिन भोर यांच्या प्रभागांचे तुकडे पडल्याने त्यांनाही सुरक्षित प्रभाग शोधावा लागणार आहे. भाजपाचे दिनकर पाटील यांचा प्रभाग मात्र पूर्णपणे सुरक्षित राहिला आहे. नाशिकरोड विभागात रिपाइंचे सुनील वाघ यांचीही आरक्षणामुळे अडचण झाली आहे. ललीता भालेराव यांना सुरक्षित प्रभागाचा शोध घ्यावा लागणार आहे. पोटनिवडणुकीत नुकत्याच निवडून आलेल्या सुनंदा मोरे यांचीही कोंडी झाली आहे. सिडको विभागात कॉँग्रेसचे लक्ष्मण जायभावे यांची परिस्थिती बिकट झाली आहे. त्यांच्या प्रभाग २७ मध्ये अनुसूचित जाती, जमाती तसेच ओबीसी महिला व सर्वसाधारण महिला असे आरक्षण पडल्याने जायभावे यांना हादरा बसला आहे. प्रभाग २९ मध्ये ओबीसी महिला, सर्वसाधारण महिला आणि उर्वरित दोन्ही जागा सर्वसाधारण राहिल्याने या प्रभागात इच्छुकांची भाऊगर्दी होण्याची शक्यता आहे. पश्चिम विभागात कॉँग्रेसचे ज्येष्ठ नगरसेवक उत्तमराव कांबळे, शिवाजी गांगुर्डे, छाया ठाकरे, योगीता अहेर यांचे प्रभाग सुरक्षित राहिले असले तरी ते आमनेसामने येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. माजी महापौर यतिन वाघ, माजी महापौर विनायक पांडे, कॉँग्रेसचे शाहू खैरे, मनसेच्या सुरेखा भोसले, सेनेत गेलेले विनायक खैरे हे मातब्बर उमेदवारही आमनेसामने उभे ठाकण्याची शक्यता आहे. पूर्व विभागात मुस्लीमबहुल भागातही तोडफोड झाल्याने गुलजार कोकणी, सुफी जीन यांची कसोटी लागणार आहे तर मनसेचे यशवंत निकुळेही आरक्षणामुळे अडचणीत सापडले आहेत.
दोन प्रभागात तीन सदस्य
प्रभाग क्रमांक १५ आणि प्रभाग क्रमांक १९ याठिकाणी तीन सदस्य असणार आहेत. प्रभाग १५ मध्ये दोन जागा महिलांसाठी, तर प्रभाग १९ मध्ये एक जागा महिलेसाठी आरक्षित करण्यात आलेली आहे. प्रभाग १५ हा माजी आमदार वसंत गिते यांचा परिसर आहे. या प्रभागाची लोकसंख्या ४० हजार १४१ इतकी आहे तर प्रभाग १९ हा नाशिकरोड येथील गोरेवाडी परिसरातील असून लोकसंख्या ३७ हजार ७१२ इतकी आहे. या दोन्ही प्रभागातही विद्यमान नगरसेवक आमनेसामने येऊन चुरस निर्माण होण्याची शक्यता आहे.
सर्वसाधारण जागांवर पडणार उड्या
आरक्षण सोडतीत काही प्रभागांमध्ये अनुसूचित जाती, जमाती व ओबीसीचे आरक्षण महिलांसाठी पडल्याने राखीव जागांवर निवडून जाणाऱ्या पुरुष नगरसेवकांची अडचण झाली आहे. त्यांना आपल्याच प्रभागात सर्वसाधारण जागेवर लढावे लागणार आहे. २८ जागा या सर्वसाधारण असल्याने याठिकाणी इच्छुकांच्या उड्या पडणार आहेत.
दृष्टिक्षेपात
एकूण प्रभाग - ३१
एकूण सदस्य - १२२
अनु. जाती - १८
अनु. जमाती - ०९
ओबीसी - ३३
सर्वसाधारण - ६२
आमदारांचे प्रभाग सुरक्षित
महापालिकेत बाळासाहेब सानप, प्रा. देवयानी फरांदे, सीमा हिरे, डॉ. राहुल अहेर आणि अपूर्व हिरे हे भाजपाचे आमदार सदस्य म्हणूनही कार्यरत होते. येत्या निवडणुकीत पाचही भाजपा आमदार पुन्हा निवडणुकीच्या रिंगणात उतरणार नसले तरी त्यांचे प्रभाग मात्र सर्वात सुरक्षित राहिले आहेत. नव्या रचनेत बाळासाहेब सानप (क्र. ३), देवयानी फरांदे, सीमा हिरे व राहुल अहेर (क्र. ७) आणि अपूर्व हिरे (क्र.२५) ह्या तीनही प्रभागातील
अ- नागरिकांचा मागास प्रवर्ग, ब- सर्वसाधारण महिला, क- सर्वसाधारण महिला आणि ड- सर्वसाधारण याप्रमाणे राहिल्याने हा निव्वळ योगायोग समजावा की ढवळाढवळ याबाबत प्रश्नचिन्ह
निर्माण झाले आहे.