कार्यकारी संचालक पदमुक्तीवरून संचालकांमध्येच वादंग?
By admin | Published: April 1, 2016 11:13 PM2016-04-01T23:13:40+5:302016-04-02T00:11:18+5:30
जिल्हा बॅँक : आज महत्त्वाची बैठक
नाशिक : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅँकेच्या कार्यकारी संचालकांना हटविण्यावरून जिल्हा बॅँकेच्या संचालक मंडळात वादंग निर्माण झाले असून, शनिवारी (दि.२) होणाऱ्या बैठकीत त्याचे पडसाद उमटण्याची चिन्हे आहेत.
दरम्यान, पदमुक्त कार्यकारी संचालकांनी मागील दोन वर्षांच्या कार्यकाळातील उकटे काढण्याचा गर्भित इशारा दिल्याची चर्चा जिल्हा बॅँकेच्या वर्तुळात असून, शनिवारच्या बैठकीत पुन्हा मागील कार्यकारी संचालकांना नियुक्ती मिळण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
कार्यकारी संचालक सुभाष देसले यांच्या नियुक्तीबाबत आलेल्या तक्रारींवरून तक्रारींची चौकशी करण्यासाठी जिल्हा लेखापरीक्षक व धुळे जिल्हा उपनिबंधक यांच्या द्विसदस्यीय चौकशी समितीमार्फत देसले यांच्या विरोधातील तक्रारींची चौकशी करण्यात आली होती. चौकशी अहवालात देसले यांच्या नियुक्तीबाबत करण्यात आलेले आक्षेप पाहता काही दिवसांपूर्वीच जिल्हा बॅँकेचे विद्यमान अध्यक्ष नरेंद्र दराडे यांनी तडकाफडकी कार्यकारी संचालक सुभाष देसले यांना पदमुक्त करून त्यांच्या पदाची सूत्रे व्यवस्थापक यशवंत शिरसाट यांच्याकडे सोपविली होती.
शनिवारी होणाऱ्या सर्व संचालकांच्या मासिक बैठकीत या विषयावर चर्चा करण्याचे विषय पत्रिकेत नमूद करण्यात आले. त्यामुळेच कार्यकारी संचालक सुभाष देसले यांच्या गच्छंतीवरून आणि प्रभारी कार्यकारी संचालकपदी यशवंत शिरसाट यांच्या नियुक्तीवरून सध्या संचालकांमध्ये गट-तट पडल्याची चर्चा आहे. (प्रतिनिधी)