जि. प. सीईओ भुवनेश्वरी यांची बदली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 17, 2020 01:45 AM2020-01-17T01:45:36+5:302020-01-17T01:46:21+5:30
नाशिक जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी एस. भुवनेश्वरी यांची अवघ्या सहा महिन्यांतच भंडारा जिल्हा परिषदेत बदली करण्यात आली असून, त्यांच्या जागी अद्याप कोणाची नियुक्ती करण्यात आलेली नसली तरी, विभागीय आयुक्त कार्यालयातील उपआयुक्त दिलीप स्वामी यांच्या नावाची चर्चा होऊ लागली आहे.
नाशिक : नाशिक जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी एस. भुवनेश्वरी यांची अवघ्या सहा महिन्यांतच भंडारा जिल्हा परिषदेत बदली करण्यात आली असून, त्यांच्या जागी अद्याप कोणाची नियुक्ती करण्यात आलेली नसली तरी, विभागीय आयुक्त कार्यालयातील उपआयुक्त दिलीप स्वामी यांच्या नावाची चर्चा होऊ लागली आहे.
एस. भुवनेश्वरी यांची जुलै महिन्यात नाशिक जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून बदली करण्यात आली होती. जिल्हा परिषदेचे कामकाज समजावून घेत असतानाच जिल्हा परिषदेचे पदाधिकारी व सदस्यांशी त्यांचे पटेनासे झाले. त्यातून प्रशासन विरुद्ध पदाधिकारी असे चित्र निर्माण होऊन त्यातून सर्वसाधारण सभा, स्थायी समितीच्या सभेत वादंग निर्माण झाले होते.
जिल्हा परिषदेचा निधी अखर्चित राहणे, अधिकाऱ्यांना पाठीशी घालण्याविषयी भुवनेश्वरी यांच्या विरोधात तक्रारी करण्यात आल्या होत्या. जिल्हा परिषदेच्या कामकाजाबाबत थेट विभागीय आयुक्त व शासनाकडेही तक्रारी करण्यात आल्या होत्या. अशातच विधानसभा निवडणुकीच्या दरम्यान भुवनेश्वरी यांचे पती व विभागीय उपायुक्त प्रदीपचंद्र यांची भंडारा जिल्हाधिकारी म्हणून बदली झाल्यानंतर पती-पत्नी एकत्रिकरणांतर्गत भुवनेश्वरी एस. यांनी स्वत:हून नाशिकहून बदलून जाण्यासाठी प्रयत्न चालविले होते. त्यानुसार राज्य सरकारने गुरुवारी अधिकाऱ्यांच्या बदल्या करताना भुवनेश्वरी यांचीही बदली केली आहे.
रिक्त जागेवर अद्याप नियुक्ती नाही़
भुवनेश्वरी यांच्या बदलीचे वृत्त जिल्हा परिषदेत येताच, त्याविषयी संमिश्र मते व्यक्त करण्यात आली. भुवनेश्वरी यांच्या जागेवर मात्र कोणाची नियुक्ती केलेली नाही. मिळालेल्या माहितीनुसार विभागीय आयुक्तालयातील उपायुक्त दिलीप स्वामी यांची नाशिक जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून नेमणूक होणार असल्याची चर्चा होऊ लागली आहे.