जिल्हा परिषदेच्या शिक्षकांनी केला आॅनलाईन प्रयोग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 17, 2020 06:35 PM2020-06-17T18:35:24+5:302020-06-17T18:37:34+5:30
जिल्हा परिषदेच्या शाळा देखील बंद असून, ग्रामीण भागात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता, ते टाळण्यासाठी नाशिक जिल्ह्यातील तंत्रस्नेही शिक्षकांनी पुढाकार घेऊन साधारणत: चौथी ते आठवी पर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी आॅनलाईन शिक्षण सुरू केले आहे.
लोकमत न्युज नेटवर्क
नाशिक : कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता राज्य सरकारने शाळा, महाविद्यालये सुरू करण्याबाबत वेळापत्रक ठरवून दिले असून, शक्यतो पुढच्या महिन्यापासून शैक्षणिक सत्र सुरू होणार असले तरी, जिल्हा परिषदेच्या २१४ शिक्षकांनी मात्र विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी विद्यार्थ्यांना आॅनलाईन शिकविण्यास सुरूवात केली आहे तर ६० शिक्षकांनी व्हाटस्अॅपच्या माध्यमातून शिक्षणाचा श्रीगणेशा केला आहे.
स्थानिक परिस्थिती लक्षात घेता ज्या शिक्षकांना शक्य आहे त्यांनी स्वयंप्रेरणेने आॅनलाइन पद्धतीने विद्यार्थ्यांना शिक्षण देण्याचे कार्य करण्याचे आवाहन जिल्हा परिषदेच्यावतीने करण्यात आले आहे. कोरोनाच्या ापार्श्वभूमीवर शालेय कामकाज सुरू करण्यााबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी वेळापत्रक ठरवून दिले असून, त्यानुसार निम्मे शैक्षणिक सत्र संपुष्टात येण्याची शक्यता आहे. अशा परिस्थितीत विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ शकते. जिल्हा परिषदेच्या शाळा देखील बंद असून, ग्रामीण भागात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता, ते टाळण्यासाठी नाशिक जिल्ह्यातील तंत्रस्नेही शिक्षकांनी पुढाकार घेऊन साधारणत: चौथी ते आठवी पर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी आॅनलाईन शिक्षण सुरू केले आहे. त्यात बागलाण १२, दिंडोरी १२१ इगतपुरी १, मालेगाव ५, नाशिक ५, निफाड १६, येवला ३० असे एकूण १९० शिक्षकांचा सहभाग आहे. ६० शिक्षकांनी विद्यार्थ्यांच्या पालकांच्या भ्रमणध्वनीचा ग्रृप करून त्याद्वारे विद्यार्थ्यांना दररोज शिक्षणाचे धडे देण्यास सुरूवात केली आहे. या उपक्रमास पालक, शाळा व्यवस्थापन समिती व ग्रामपंचायतीचे या कामी सहकार्य मिळाले असून, शिक्षकांच्या या स्वयंप्रेरणेचे जिल्हा परिषदेचे अध्यक्ष बाळासाहेब शिरसागर, शिक्षण सभापती सुरेखा दराडे, मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड, शिक्षणाधिकारी वैशाली वीर यांनी कौतुक केले आहे.