गणेश मंडळांवरील विघ्न अखेर दूर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 23, 2019 01:17 AM2019-08-23T01:17:23+5:302019-08-23T01:18:02+5:30
शहरात गणेशोत्सव मंडळांवरील अनेक विघ्ने यंदा दूर झाली आहेत. भालेकर मैदानावर आयुक्तांनी उत्सवासाठी परवानगी दिली आहे. तर स्मार्ट रोडचे मेहेर ते अशोकस्तंभ दरम्यानचे काम मंगळवारपर्यंत (दि.२७) पूर्ण होऊन हा मार्ग खुला केला जाण्याची शक्यता असल्याने अशोकस्तंभावरील दोन मंडळांना उत्सवासाठी परवानगी मिळण्याच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.
नाशिक : शहरात गणेशोत्सव मंडळांवरील अनेक विघ्ने यंदा दूर झाली आहेत. भालेकर मैदानावर आयुक्तांनी उत्सवासाठी परवानगी दिली आहे. तर स्मार्ट रोडचे मेहेर ते अशोकस्तंभ दरम्यानचे काम मंगळवारपर्यंत (दि.२७) पूर्ण होऊन हा मार्ग खुला केला जाण्याची शक्यता असल्याने अशोकस्तंभावरील दोन मंडळांना उत्सवासाठी परवानगी मिळण्याच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. दरम्यान, रात्री दहा वाजेनंतर बारा वाजेपर्यंत ध्वनिवर्धकावरील संगीताशिवाय देखावे खुले ठेवावेत तसेच मिरवणुकीतही रात्री दहा वाजेनंतर विसर्जनापर्यंत पारंपरीक वाद्ये वाजविण्यास परवानगी द्यावी ही मागणी तत्त्वत: पोलीस आयुक्तांनी मान्य केली आहे.
नाशिक महानगर सार्वजनिक गणेशोत्सव महामंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी गुरुवारी (दि.२७) यांसदर्भात पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील आणि महापालिका आयुक्त राधाकृष्ण गमे यांना विविध मागण्यांसंदर्भात निवेदन देण्यात आले. मध्य नाशिक आणि गावठाणातील गणेशोत्सव पारंपरिक जागेवरच व्हावेत. मिरवणूक मार्ग हा गावठाण भागातून असून अनेक ठिकाणी वाडे धोकादायक असल्याने त्यासंदर्भात कारवाई करावी, रविवार कारंजा, महात्मा गांधी रोड, मेहेर, रविवार पेठ येथे फुटपाथवरील अतिक्रमणे त्वरित हटवावीत अशा मागण्या करण्यात आल्या. उच्च न्यायालयाचे आदेश म्हणून पोलिसांच्या वतीने रात्री दहा वाजता देखाव्यांवरील ध्वनिक्षेपक बंद करण्यास हरकत नाही; मात्र देखावे बंद करण्याची सक्ती करू नये, कारण बहुतांशी नागरिक हे रात्री देखावे पाहण्यास निघतात त्याचवेळी पोलीस अन्य व्यावसायिकांप्रमाणेच देखावे बंद करतात तसे करू नये त्याचप्रमाणे पुण्याच्या धर्तीवर रात्री दहा वाजेनंतर विसर्जन मिरवणुकीत पारंपरिक वाद्य वाजवण्यास परवानगी द्यावी, अशी मागणी महामंडळाचे अध्यक्ष समीर शेटे तसेच गजानन शेलार, रामसिंग बावरी, शंकरराव बर्वे, बबलू परदेशी, पद्माकर पाटील यांनी केली आहे. भालेकर मैदानावर स्मार्ट पार्किंगमुळे गणेशोत्सव मंडळांना परवानगी देण्याचा प्रश्न निकाली निघाला आहे. आठ मंडळांना याठिकाणी परवानगी देण्यात आली आहे.
महापालिकेत आज गणेश मंडळांची बैठक
महापालिकेत दरवर्षीप्रमाणे यंदाही शहरातील गणेश मंडळांची बैठक शुक्रवारी (दि. २३) दुपारी साडेतीन वाजता होणार आहे. यावेळी महापालिकेबरोबरच विविध शासकीय खात्यांचे अधिकारी उपस्थित होते.