पंधरा दिवस लाखो बालके राहिली आहारापासून वंचित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 4, 2020 09:05 PM2020-05-04T21:05:02+5:302020-05-04T23:07:23+5:30
नाशिक : अचानक आलेल्या कोरोनाच्या संकटापासून शाळकरी मुलांबरोबरच अंगणवाडीतील बालकांना वाचविण्यासाठी शासनाने अंगणवाड्या बंद करण्याचा निर्णय घेतला असला तरी, या बालकांना देण्यात येणाऱ्या पोषण आहाराबाबतची कोणतीही पूर्वतयारी न करता या निर्णयाची अंमलबजावणी करण्यात आल्याने जिल्ह्यातील लाखो बालकांना जवळपास पंधरा दिवस पोषण आहारापासून वंचित राहावे लागले. मात्र त्यानंतर महिला व बाल कल्याण विभागाने याकामी भरारी घेऊन पोषण आहारांतर्गत राज्यात सर्वाधिक सुमारे १७ लाख अंडी पुरविण्याचा विक्रम नोंदविला आहे.
नाशिक : अचानक आलेल्या कोरोनाच्या संकटापासून शाळकरी मुलांबरोबरच अंगणवाडीतील बालकांना वाचविण्यासाठी शासनाने अंगणवाड्या बंद करण्याचा निर्णय घेतला असला तरी, या बालकांना देण्यात येणाऱ्या पोषण आहाराबाबतची कोणतीही पूर्वतयारी न करता या निर्णयाची अंमलबजावणी करण्यात आल्याने जिल्ह्यातील लाखो बालकांना जवळपास पंधरा दिवस पोषण आहारापासून वंचित राहावे लागले. मात्र त्यानंतर महिला व बाल कल्याण विभागाने याकामी भरारी घेऊन पोषण आहारांतर्गत राज्यात सर्वाधिक सुमारे १७ लाख अंडी पुरविण्याचा विक्रम नोंदविला आहे.
राज्य सरकारने १६ मार्चपासूनच शाळा, महाविद्यालये, अंगणवाड्या बंद करण्याचा निर्णय घेतला. परिणामी शाळांमधून मिळणारे मध्यान्ह भोजन व अंगणवाडीतील शून्य ते तीन व तीन ते सहा अशा दोन वयोगटांतील बालकांना ताजा सकस पोषण आहारदेखील बंद झाला. त्यामुळे जिल्ह्यातील सुमारे साडेतीन लाख बालकांच्या उदरभरणाचा प्रश्न निर्माण झाला. यासंदर्भात जिल्हा परिषद प्रशासन तसेच एकात्मिक बालविकास सेवायोजनेच्या अधिकाऱ्यांनी शासनाकडे पाठपुरावा केल्यामुळे तब्बल पंधरा दिवसांनंतर या संदर्भातील निर्णय घेऊन खासगी पुरवठादारालाच अंगणवाडीतील बालकांना घरपोहोच पोषण आहार पुरविण्याचे आदेश दिले. त्यानंतर मात्र एकात्मिक बालविकास विभागाने भरारी घेत, अंगणवाडीतील शून्य ते तीन व तीन ते सहा वयोगटांतील बालकांसाठी घरपोहोच पोषण आहार पोहोचविला. अमृत आहार योजनेंतर्गत आदिवासी भागात राज्यात सर्वाधिक १७ लाख अंडींचे वाटप केले.
----------
कुपोषणामुळे बळीचा इन्कार
नाशिक जिल्ह्यातील पंधरापैकी आठ तालुके आदिवासी असून, या तालुक्यांमध्ये बाराही महिने कुपोषणाचा प्रश्न कायम आहे. अल्पवयात केलेले लग्न, आरोग्य सुविधेची वाणवा व रोजगाराच्या अभावामुळे अतिदुर्गम भागात कुपोषण कायम असले तरी, आरोग्य विभागाच्या मते लॉकडाउनच्या काळात कुपोषणामुळे बालकांचा मृत्यू झालेला नाही. जन्मत: मृत्यू व आजारापणामुळे होणारे मृत्यू ही नित्याचीच बाब आहे.
-------------------
सुरक्षित अंतराचे पालन
जिल्ह्यात गरोदर व स्तनदा माता असून, त्याचबरोबर किशोरवयीन मुलींचाही विचार करून आरोग्य विभागाच्या वतीने आरोग्याची तपासणी, तर अंगणवाडीसेविका, कार्यकर्तींच्या माध्यमातून पोषण आहार, औषधांचे वाटप घरोघरी जाऊन करण्यात आले आहे. यासाठी ग्रामपंचायतींनी सुरक्षित अंतर राखण्यासाठी गावोगावी मदत केली. आशा सेविकांनी घरोघरी जाऊन तपासणी केली, तर अंगणवाडी सेविकांनी पोषण आहार वितरित केल्याने गर्दी टाळण्यास मदत झाली. काही ठिकाणी ग्रामपंचायतींनीच पुढाकार घेतला.
---------------
घरपोहोच आहाराचे वाटप
अंगणवाडीतील बालकांची संख्या लक्षात घेता १५ मेपर्यंत पुरेल इतका पोषण आहार पोहोचविण्यात आला आहे. त्याचबरोबर गरोदर स्त्रियांसाठी मे महिन्याचा आहारही देण्यात आला असून, आदिवासी बालकांना ‘अमृत आहार’ पोहोचला आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव होण्यापूर्वीच अंगणवाडी सेविकांनी गावोगावी, घरोघरी जाऊन हात धुण्याचे प्रात्यक्षिके करून नागरिकांना जागरूक केले आहे.
- दीपक चाटे
महिला व बालविकास अधिकारी
----------------
चिमुरड्यांचे आरोग्य सुधारण्यासाठी मदत
शासनाच्या वतीने अंगणवाडीतील मुलांना दिला जाणारा पोषण आहार लॉकडाउनच्या काळातही वेळेत मिळत आहे. सध्याची
ग्रामीण भागातील रोजगाराची परिस्थिती अत्यंत खराब आहे. अशा बिकट परिस्थितीत आमच्या लहानग्यांना मिळणारा पोषण आहार खºया अर्थाने
मुलांचे आरोग्य सुधारण्यासाठी कामी पडत आहे.
- ज्योती विलास काकड
पालक, नायगाव (सिन्नर)
-----------------------------
बालक, पालकांच्या जागृतीवर भर
लॉकडाउनच्या काळापासूनच अंगणवाडी सेविकांची जबाबदारी वाढली होती. बालके, स्तनदा व गरोदर मातांना पोषण आहार पुरविण्याबरोबरच त्यांच्या आरोग्याची जबाबदारीही होती. त्यामुळे सर्व अंगणवाडी सेविकांनी घरोघरी जाऊन पोषण आहार तर पुरविलाच, परंतु पालकांना पाककृती समजावून सांगितली. त्याचबरोबर आरोग्यविषयक जागृती करण्यात आली.
- उत्तरा कुमावत
अंगणवाडी पर्यवेक्षक
----------------------