राज्यात ६५ लाख ८० हजार क्विंटल अन्नधान्याचे वाटप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 27, 2020 12:15 AM2020-05-27T00:15:32+5:302020-05-27T00:16:38+5:30
राज्यातील ५२ हजार ४२८ स्वस्त धान्य दुकानांमधून १ ते २५ मेपर्यंत राज्यातील १ कोटी ४४ लाख ७५ हजार ७३५ शिधापत्रिकाधारकांना ६५ लाख ८० हजार ३३० क्विंटल अन्नधान्याचे वाटप करण्यात आले. तसेच २७ लाख २८ हजार ५०२ शिवभोजन थाळ्यांचे वाटप करण्यात आले असल्याची माहिती राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षणमंत्री छगन भुजबळ यांनी दिली.
नाशिक : राज्यातील ५२ हजार ४२८ स्वस्त धान्य दुकानांमधून १ ते २५ मेपर्यंत राज्यातील १ कोटी ४४ लाख ७५ हजार ७३५ शिधापत्रिकाधारकांना ६५ लाख ८० हजार ३३० क्विंटल अन्नधान्याचे वाटप करण्यात आले. तसेच २७ लाख २८ हजार ५०२ शिवभोजन थाळ्यांचे वाटप करण्यात आले असल्याची माहिती राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षणमंत्री छगन भुजबळ यांनी दिली.
राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेअंतर्गत अंत्योदय व प्राधान्य कुटुंब लाभार्थी असे दोन्ही रेशनकार्डमधील पात्र लाभार्थ्यांची संख्या सुमारे ७ कोटी आहे. या लाभार्थ्यांना ५२ हजार ४२८ स्वस्त धान्य दुकानांद्वारे सार्वजनिक वितरण व्यवस्थेचा लाभ दिला जातो. या योजनेमधून सुमारे १९ लाख ७७ हजार १९१ क्विंटल गहू, १५ लाख १८ हजार ९२५ क्विंटल तांदूळ, तर २१ हजार ९८ क्विंटल साखरेचे वाटप करण्यात आले आहे. लॉकडाउनमुळे राज्यात अडकलेल्या सुमारे ३ लाख ९९ हजार ५७९ शिधा पत्रिकाधारकांनी आॅनलाइन पद्धतीने धान्य घेतले आहे.
४ मेपासून एकूण १ कोटी ३ लाख ७१ हजार ८२५ रेशनकार्डधारकांना मोफत तांदूळ वाटप केले आहे. राज्य शासनाने कोविड-१९ संकटावरील उपाययोजनेसाठी ३ कोटी ०८ लाख ४४हजार ७६ एपीएल केसरी लाभार्थ्यांना मे व जून या २ महिन्यासाठी प्रतिव्यक्ती ५ किलो धान्य सवलतीच्या दराने ( गहू ८ रु पये प्रति किलो व तांदूळ १२ रु पये प्रतिकिलो) देण्याचा निर्णय घेतला आहे. या धान्याचे वाटप दि.२४ एप्रिलपासून सुरू होऊन आतापर्यंत ७ लाख ५३ हजार ८१० क्विंटल धान्याचे वाटप केले आहे.
प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेत प्रतिरेशनकार्ड १ किलो मोफत डाळ (तूर किंवा चणा डाळ) देण्याची तरतूद आहे. या योजनेतून सुमारे ५१ हजार ७९८ क्विंटल डाळीचे वाटप केले आहे.
राज्यात २५ मेपर्यंत ८२२ शिवभोजन केंद्रातून पाच रुपये प्रतिथाळी याप्रमाणे २७ लाख २८ हजार ५०२ शिवभोजन थाळ्यांचे वाटप करण्यात आले आहे, अशी माहिती छगन भुजबळ यांनी दिली.