जिल्ह्यात संगणकीय सातबारा वितरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 1, 2017 11:28 PM2017-08-01T23:28:23+5:302017-08-02T00:10:16+5:30
प्रत्येक नागरिकाचा जिव्हाळ्याचा विषय असलेल्या सातबारा उताºयाचे संगणकीकरणाचे काम जिल्ह्यात ९७ टक्के पूर्ण झाले असल्याने येत्या १५ आॅगस्टपासून खातेदारास संगणकीय सातबारा उतारा देण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी बालसुब्रह्मण्यम राधाकृष्णन यांनी दिली.
नाशिक : प्रत्येक नागरिकाचा जिव्हाळ्याचा विषय असलेल्या सातबारा उताºयाचे संगणकीकरणाचे काम जिल्ह्यात ९७ टक्के पूर्ण झाले असल्याने येत्या १५ आॅगस्टपासून खातेदारास संगणकीय सातबारा उतारा देण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी बालसुब्रह्मण्यम राधाकृष्णन यांनी दिली.
राज्य सरकारने संगणकीय सातबारा देण्यासाठी वर्धा व नाशिकची पायलट प्रोजेक्टसाठी निवड केली होती, त्यानुसार गेल्या काही वर्षांपासून हस्तलिखित सातबारा उताºयाचे संगणकीकरणाचे काम सुरू करण्यात आले. त्यासाठी तलाठ्यांना लॅपटॉपचे वाटप करण्याबरोबरच इंटरनेटची जोडणीही देण्यात आली, तथापि, अतिशय किचकट असलेल्या या कामात वेळोवेळी तांत्रिक दोषही निर्माण झाल्याने हे काम वर्षानुवर्षे रखडले. अखेर जिल्ह्यातील १२ लाख १८ हजार १७३ खातेदारांपैकी ११ लाख ८३ हजार ३३२ खातेदारांचे संगणकीकरण करण्यात आले असून, त्याचे प्रमाण ९७.१४ टक्केइतके आहे. अद्याप ३४ हजार ८४१ खातेदारांचे काम सुरू आहे. जिल्ह्यातील पेठ तालुक्यात शंभर टक्के संगणकीकरण झाले असून, नाशिकमध्ये सर्वांत कमी म्हणजेच ८९.८० टक्के इतके काम झाले आहे. नाशिक शहरात दोन लाख १० हजार ४७३ खातेदार असून, त्यापैकी एक लाख ८९ हजार ००६ इतक्या खातेदारांचे संगणकीकरणाचे काम पूर्ण झाले आहे. येत्या दहा दिवसांत अपूर्ण काम पूर्ण करून १५ आॅगस्ट रोजी पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत नाशिक येथे तर प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी त्या त्या लोकप्रतिनिधींच्या हस्ते संगणकीय सातबारा उताºयाचे वाटप करण्यात येणार असल्याचेही जिल्हाधिकाºयांनी सांगितले.जिल्ह्यात ज्या ठिकाणी हस्तलिखित व संगणकीय सातबारा उतारा तंतोतंत जुळले अशा ठिकाणी १ जानेवारी २०१७ पासूनच सातबारा उतारे आॅनलाइन पद्धतीने व डिजिटल सिग्नेचर वापरून नागरिकांना देण्यात येत असून, आजपावेतो ६,४८४ इतके उतारे वाटप करण्यात आल्याचे ते म्हणाले. सातबारा उताºयासाठी तलाठी व मंडल अधिकाºयाच्या कार्यालयाच्या चकरा टाळण्यासाठी नागरिकांनी ‘आपलं सरकार’ या पोर्टलचा वापर करून डिजिटल स्वाक्षरीचे साताबारा उतारा प्राप्त करून घ्यावा, असे आवाहनही त्यांनी केले.