पाेषण आहार याेजनेंतर्गत हरभरा, मसूर डाळींचे वितरण सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 20, 2021 04:13 AM2021-03-20T04:13:38+5:302021-03-20T04:13:38+5:30
मालेगाव : शालेय पाेषण आहार याेजनेंतर्गत केंद्रीय स्वयंपाकगृह प्रणालीत समाविष्ट असलेल्या शाळांना हरभरा व मसूर डाळ उपलब्ध ...
मालेगाव : शालेय पाेषण आहार याेजनेंतर्गत केंद्रीय स्वयंपाकगृह प्रणालीत समाविष्ट असलेल्या शाळांना हरभरा व मसूर डाळ उपलब्ध झाली आहे. पहिली ते पाचवी व सहावी ते आठवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना याचा लाभ मिळणार आहे. जून २०२० ते एप्रिल २०२१ या कालावधीतील धान्य वितरीत करण्याचे आदेश महापालिका शिक्षण मंडळाचे प्रशासनाधिकारी एफ. डब्ल्यू. चव्हाण यांनी संबंधित शाळांच्या मुख्याध्यापकांना दिले आहेत. सध्या काेराेना प्रादुर्भावामुळे शाळा बंद ठेवण्यात आल्या आहेत. मात्र, उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने रिट याचिकेच्या सुनावणीत पाेषण आहार याेजनेंतर्गत पात्र विद्यार्थ्यांना धान्यादी वस्तू वितरित करण्याचे निर्देश दिले आहेत. त्यानुसार विद्यार्थ्यांना नियमित तांदळासह हरभरा व मसूरडाळ देण्याचा निर्णय झाला आहे. हे धान्य वाटपाचे नियाेजन करण्याच्या सूचना मुख्याध्यापकांना देण्यात आल्या आहेत. काेराेनाचा संसर्ग टाळण्यासाठी धान्य वाटपावेळी शाळेत गर्दी हाेणार नाही, याची खबरदारी घ्यावी, वाटप हाेणाऱ्या तांदूळ व इतर धान्यादी वस्तूंची माहिती दर्शनी फलकावर लिहावी, वाटप वस्तूंची नाेंद घेऊन शाळास्तरावर मुख्याध्यापक, व्यवस्थापन समिती अध्यक्ष यांच्या स्वाक्षऱ्या घ्याव्यात. वजन करुन माल ताब्यात घेत तेवढ्याच वजनाची पावती पुरवठादारास द्यावी, वस्तू वाटपात कुठलाही हलगर्जीपणा करु नये, यासंदर्भात विद्यार्थी किंवा पालकांची तक्रार आल्यास कारवाई केली जाईल, अशा सूचना चव्हाण यांनी दिल्या आहेत.
--------------------
पहिली ते पाचवीच्या एका विद्यार्थ्यास ७ किलाे ३०० ग्रॅम हरभरा व पाच किलाे मसूरडाळ दिली जाईल. तर सहावी ते आठवीपर्यंतच्या विद्यार्थ्यास हरभरा १० किलाे ३०० ग्रॅम व आठ किलाे मसूरडाळ मिळणार आहे. या धान्यादी वस्तू सुट्या स्वरुपात असल्याने लाभार्थी विद्यार्थी किंवा त्यांच्या पालकांनी कापडी पिशवी अथवा गाेणी साेबत आणावी, असे आवाहन करण्यात आले आहे.