सिन्नरला उद्योगरत्न पुरस्कारांचे वितरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 29, 2020 11:10 PM2020-02-29T23:10:32+5:302020-02-29T23:12:54+5:30
सिन्नर : येथील सॅटर्डे ग्लोबल ट्रस्टच्या वतीने उद्योगरत्न पुरस्कारांचे वितरण करण्यात आले. उद्योग, व्यवसाय करताना आदर्शवत यश गाठलेल्या व सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या उद्योजकांच्या पाठीवर कौतुकाची थाप मारणे महत्त्वाचे आहे. त्यापासून इतरांनाही प्रेरणा मिळते. सिन्नर शाखेने घालून दिलेला आदर्शही प्रेरणादायी असल्याचे प्रतिपादन क्लबचे मुख्य सचिव नरेंद्र बगाडे यांनी केले.
लोकमत न्यूज नेटवर्क
सिन्नर : येथील सॅटर्डे ग्लोबल ट्रस्टच्या वतीने उद्योगरत्न पुरस्कारांचे वितरण करण्यात आले.
उद्योग, व्यवसाय करताना आदर्शवत यश गाठलेल्या व सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या उद्योजकांच्या पाठीवर कौतुकाची थाप मारणे महत्त्वाचे आहे. त्यापासून इतरांनाही प्रेरणा मिळते. सिन्नर शाखेने घालून दिलेला आदर्शही प्रेरणादायी असल्याचे प्रतिपादन क्लबचे मुख्य सचिव नरेंद्र बगाडे यांनी केले.
सॅटर्डे क्लबच्या वतीने देण्यात आलेल्या उद्योगरत्न पुरस्कार वितरण सोहळ्याप्रसंगी ते बोलत होते.
क्लबचे अध्यक्ष अमोल कासार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कार्यक्रमास उद्योजक दिलीप औटी, उपसचिव संजय मोरे, सिन्नर शाखेचे सचिव अवधूत वाघ, कोषाध्यक्ष उमेश डागा, नीलेश पावसकर, नीलेश विधाते, प्रवीण काकड, जाकीर मन्सुरी, निमाचे सुधीर बडगुजर, सिन्नर औद्योगिक वसाहतीचे संचालक नामकर्ण आवारे, व्यवस्थापक कमलाकर पोटे, उद्योजक सुनील चकोर, रामभाऊ डोंगरे, देवेंद्र महात्मे, विकास महाजन, राहुल भावसार, सोपान परदेशी, अमोल कापसे, शिवनाथ कापडी, राधेश्याम दंताळ आदी उपस्थित होते.
उद्योजकांनी आपापल्या क्षेत्रात कठीण काळात उद्योग व्यवसाय सुरू केला. आज तो नावारूपाला आणला आहे. उद्योग व्यवसायात महाराष्ट्रीयन माणूस विकसित झाला पाहिजे. राज्यात ११ हजारावर महाराष्ट्रीय उद्योजक आहेत. यापैकी ट्रस्टमध्ये अडीच हजार उद्योजक सहभागी झाले आहेत. मराठी उद्योजकांसाठीची ही चळवळ आता वेगाने प्रवाही झाली असल्याचे ते म्हणाले. २० वर्षांच्या काळात चळवळीने अनेक टप्पे पार केले आहेत. आता व्यापक स्वरूप आल्याने छोट्या माधवराव भिडे यांनी लावलेल्या रोपट्याचे वटवृक्षात रूपांतर झाल्याचे ते म्हणाले.
स्नेहा कासार, ग्रीष्मा कासार, अर्पित कासार यांनी सांस्कृतिक कार्यक्रम सादर केला.
ट्रस्टने मराठी उद्योजकांना भरारी दिली असून, एकमेकांच्या सहकार्याने आणखी बळ प्राप्त झाल्याचे उद्योजक व प्रख्यात मार्गदर्शक दिलीप औटी यांनी सांगितले. स्पर्धेत नेहमी ऊर्जा जिंकते. त्यामुळे उच्च पातळीची ऊर्जा अंगी ठेवून जगायला शिकले पाहिजे. त्यामुळे कठीण गोष्टही सोपी होऊन यश मिळते. उपसचिव मोरे यांनी जगात भरारी मारण्याची ताकद चळवळीने उपलब्ध करून दिल्याचे मत व्यक्त केले. अध्यक्ष कासार यांनी ट्रस्टच्या तीन वर्षांचा लेखाजोखा मांडताना चळवळ वेगळ्या उंचीवर पोहोचवल्याचे सांगितले. या काळात लहान घटकांनाही सोबत घेतल्याने यश मिळाल्याचे ते म्हणाले. यावेळी पुरस्कार्थींच्या वतीने कुलकर्णी, कुंदे, राजेंद्र देशपांडे, ट्रस्टचे मयूर आव्हाड, विकास महाजन आदींनी मनोगत व्यक्त केले. किरण खोत यांनी सूत्रसंचालन केले. उमेश डागा यांनी आभार मानले.यांचा झाला गौरवट्रस्टला एक हजार दिवस पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर उद्योजक एम. जी. कुलकर्णी, सुनील कुंदे, तेजस कपोते, सविता देशपांडे, शर्मिला शिंदे, अलका जपे यांना सिन्नर उद्योगरत्न पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.