नवदुर्गा पुरस्कारांचे वितरण
By admin | Published: March 8, 2016 11:20 PM2016-03-08T23:20:17+5:302016-03-08T23:23:33+5:30
कालिका मंदिर संस्थान : नऊ महिलांचा गौरव
नाशिक : जागतिक महिलादिनानिमित्ताने कालिका देवी मंदिर संस्थानच्या वतीने विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या महिलांचा गौरव करण्यात आला. यावेळी महापौर अशोक मुर्तडक, उपमहापौर गुरुमित बग्गा यांच्या हस्ते पुरस्कारांचे वितरण करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अण्णासाहेब पाटील होते.
कार्यक्रमास डॉ. हेमलता पाटील, वत्सला खैरे, माजी आरोग्यमंत्री शोभा बच्छाव आदि प्रमुख पाहुणे उपस्थित होेते. यावेळी बोलताना बग्गा म्हणाले, घटनेतील अभिव्यक्ती स्वातंत्र्यामुळे महिलांची प्रगती झाली आहे. मात्र सद्यस्थितीत अभिव्यक्ती स्वातंत्र्याची गळचेपी होत असून, सरकारची भूमिका आरक्षण विरोधी असल्याने आगामी काळात महिलांचे आरक्षणही रद्द होण्याची भीती व्यक्त करीत महिलांनी याविषयी जागरूक राहण्याची आवश्यकता असल्याचे त्यांनी सांगितले. दरम्यान, प्रशासन विभागातील पुरवठा अधिकारी सरिता नरके यांच्यासह शिक्षण व राजकारण क्षेत्रात काम करणाऱ्या निमा नवले, सामाजिक कार्यकर्त्या इम्युली डिसूझा, पोलीस उपआयुक्त एन. अंबिका, संगीत व गायन क्षेत्रातील रेखा महाजन, पत्रकार वैशाली सोनार, शिक्षणाधिकारी प्रणिता कुमावत, लेखिका मैथिली गोखले व गटविकास अधिकारी चित्रलेखा कोठावदे यांना नवदुर्गा पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. त्याचप्रमाणे विविध क्षेत्रांत विशेष काम करणाऱ्या नऊ महिलांनाही विशेष पुरस्कार आणि क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या ४० खेळाडूंना प्रोत्साहानपर पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. (प्रतिनिधी)