पोलीस बंदोबस्तात खत वाटप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 5, 2022 12:17 AM2022-02-05T00:17:57+5:302022-02-05T00:18:37+5:30
सायखेडा : खते उपलब्ध झाल्याचे समजताच शेतकऱ्यांनी एकच गर्दी केली, त्यानंतर शेतकऱ्यांची गर्दी वाढल्याने अखेर पोलिसांना पाचारण करीत त्यांच्या उपस्थितीत खतांचे वाटप सायखेडा येथे करण्यात आले.
सायखेडा : खते उपलब्ध झाल्याचे समजताच शेतकऱ्यांनी एकच गर्दी केली, त्यानंतर शेतकऱ्यांची गर्दी वाढल्याने अखेर पोलिसांना पाचारण करीत त्यांच्या उपस्थितीत खतांचे वाटप सायखेडा येथे करण्यात आले.
अनेक महिन्यांपासून शेतकऱ्यांना पिकांसाठी लागणारी रासायनिक खते मिळत नसल्याने शेतकरी हैराण झाले आहेत. पीक जोमाने वाढत नसल्याने शेतकरी चिंताग्रस्त असताना सायखेडा येथील मनीषा एजन्सीमध्ये डीएपी आणि १०:२६:२६ हे खत उपलब्ध झाले असून खत आल्याची बातमी गोदाकाठ भागात वाऱ्यासारखी पसरली अनेक महिन्यांनी खत आल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळणार, पिकांना जीवदान मिळेल, अशी अपेक्षा ठेवून शेतकरी खत खरेदी करण्यासाठी दुकानात गेले. मात्र अनेक दिवसांपासून खते नसल्याने शेतकऱ्यांनी एकच गर्दी केली होती. शेतकऱ्यांची गर्दी वाढत चालली, खतांच्या गोण्या कमी पडतील, असा अंदाज झाल्यावर शेतकरी एकमेकांना ढकलत होते. दुकानदाराने तत्काळ सायखेडा पोलिसांना कळवले. अखेर साहाय्यक पोलीस निरीक्षक पी. बी. काद्री यांनी दुकान परिसरात बंदोबस्त लावून शेतकऱ्यांना प्रत्येकी एका गोणीचे वाटप करण्यात आले.
मागील काही महिन्यांपासून शेती पिकांसाठी लागणाऱ्या रासायनिक खतांचा मोठा तुटवडा आला आहे. दुकानदारांकडे खते येत नसल्याने शेतकऱ्यांना पिकांना कशाची मात्रा द्यावी, असा प्रश्न भेडसावत आहे.
सध्या कांदा आणि द्राक्ष, गहू, भाजीपाला या रब्बी हंगामातील पिकांची लागवड झाली असल्यामुळे या पिकांच्या जोमदार वाढीसाठी खते आवश्यक आहेत. केवळ सेंद्रिय खते मार्केटमध्ये उपलब्ध आहेत. मात्र जमिनीला रासायनिक खतांची सवय झाली आहे आणि पिकाची तत्काळ जोमदार वाढ होण्यासाठी रासायनिक खतांची गरज आहे. पण ते वेळेत मिळत नसल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत.
शासन रासायनिक खतांचा कृत्रिम तुटवडा निर्माण करत आहे. वारंवार खतांच्या सबसिडी कमी करणे, खतांवरील कर वाढवणे, भाडेवाढ करणे, असे प्रकार होत असल्याने खत मिळत नाही, असा शेतकऱ्यांनी आरोप केला आहे, शासन शेतकऱ्यांना खते पुरवू शकत नाही, तेव्हा बाजारभाव दुप्पट कसे करणार, अशी भावना व्यक्त केली जात आहे.