कोरोनापासून बचाव करीत घरोघरी गोळ्यांचे वाटप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 5, 2021 04:14 AM2021-03-05T04:14:45+5:302021-03-05T04:14:45+5:30
देशात पाच वर्षाखालील मुला-मुलींमध्ये ७० टक्के रक्तक्षयाचे प्रमाण आढळते. महाराष्ट्रात पाच वर्षाखालील कुपोषणामुळे वाढ खुंटलेल्या बालकांमध्येही हेच प्रमाण ...
देशात पाच वर्षाखालील मुला-मुलींमध्ये ७० टक्के रक्तक्षयाचे प्रमाण आढळते. महाराष्ट्रात पाच वर्षाखालील कुपोषणामुळे वाढ खुंटलेल्या बालकांमध्येही हेच प्रमाण असून, महाराष्ट्रात मातीतून प्रसारित होणाऱ्या कृमीचे प्रमाण २९ टक्के आढळलेले आहे. त्यामुळे राष्ट्रीय जंतनाशक दिन ही आरोग्य विभागामार्फत दरवर्षी दोनदा वर्षातून राबविण्यात येते, यामध्ये शाळेत जाणाऱ्या मुलांचे आरोग्य चांगले ठेवणे पोषण स्थिती शिक्षण व जीवनाचा दर्जा उंचावणे हे प्रमुख उद्दिष्ट आहे. यामध्ये सहा महिन्याच्या आतील बालकाला अर्धी गोळी तर त्यापुढील प्रत्येकाला एक गोळी देण्यात येत आहे. शाळकरी विद्यार्थ्यांना शाळेत, अंगणवाडीतील बालकांना अंगणवाडी सेविकांच्या माध्यमातून तर उर्वरितांना आशा व आरोग्य कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून गोळ्यांचे वाटप केले जात आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी पुरेशी खबरदारी घेण्याच्या सूचना संबंधितांना देण्यात आल्या आहेत.
----
एकूण लाभार्थी- १३,४१,५७०
०१ ते ०२ वर्षे- १,०३,८३८
०३ ते १९ वर्षे- १२,३७,७३२
------
बारा हजार कर्मचाऱ्यांची फौज
जंत नाशक गोळ्यांचे घरोघरी जाऊन वाटप करण्यासाठी ३५३२ आशा कर्मचारी, ५२२६ अंगणवाडी सेविका, ३९९७ शाळेतील शिक्षकांबरोबरच आरोग्य कर्मचाऱ्यांची फौज आरोग्य विभागाने तैनात ठेवली आहे.
----------
काळजी घेत घरोघरी वाटप सुरू
कोरोनापासून बचाव घेण्याच्या उपाययोजना व त्याचे प्रात्यक्षिकाबाबतची माहिती प्रत्येक नागरिकांपर्यंत यापूर्वीच पोहोचली आहे. त्यामुळे जंतनाशक गोळ्यांचे वाटप करतांना सुरक्षित अंतर ठेवून व हाताला स्पर्श न करता गोळ्या वाटप केल्या जात आहे. तसेच गर्दी टाळण्यावर विशेष लक्ष आहे.
---------
पुरेपुर खबरदारी
जंतनाशक गोळ्यांचे घरोघरी वाटप करण्याची जबाबदारी सोपविलेल्या आशा कर्मचारी, अंगणवाडी सेविका, आरोग्य सेविकांना यापूर्वीच कोरोनापासून बचावासाठीचे प्रशिक्षण दिले असल्यामुळे त्यांच्या माध्यमातून जिल्ह्यातील सुमारे तेरा लाख मुलांना गोळ्यांचे वाटप यशस्वीपणे केले जात आहे.
- डॉ. कपिल आहेर, जिल्हा आरोग्य अधिकारी