विभागातील पाच ग्रामपंचायतींना ‘माझी वसुंधरा’चे चार कोटींचे वाटप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 11, 2021 04:11 AM2021-07-11T04:11:44+5:302021-07-11T04:11:44+5:30
गेल्यावर्षी २ ऑक्टोबर ते १५ एप्रिल २०२१ या दरम्यान राज्यपातळीवर स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये ‘माझी वसुंधरा अभियान’ राबविण्यात आले होते. ...
गेल्यावर्षी २ ऑक्टोबर ते १५ एप्रिल २०२१ या दरम्यान राज्यपातळीवर स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये ‘माझी वसुंधरा अभियान’ राबविण्यात आले होते. त्यात पृथ्वी, वायु, जल, अग्नी आणि आकाश या निसर्गाशी संबंधित पंचतत्त्वाचा आधार त्यासाठी घेण्यात आला होता. पर्यावरणाचे रक्षण हाच त्यामागचा हेतू असल्याने महापालिका, नगरपालिका, नगरपंचायत, जिल्हा परिषद, पंचायत समिती, ग्रामपंचायत पातळीवर हे अभियान राबविण्यात आले असता, त्याचे गुणांकन करून स्पर्धेतील ग्रामपंचायतींची निवड करण्यात आली होती. जागतिक पर्यावरणदिनी ५ जून रोजी शासनाने हे पुरस्कार जाहीर केले असता, त्यात नाशिक जिल्ह्यातील निफाड तालुक्यातील पिंपळगाव बसवंत ही ग्रामपंचायत राज्यात प्रथम, तर मिरगाव ता. कर्जत (नगर) ही ग्रामपंचायत द्वितीय, चिनावल, ता. रावेर (जळगाव) ही ग्रामपंचायत तृतीय व पहुरपेठ (जळगाव) लोणी बु. (नगर) या दोन्ही ग्रामपंचायतींना उत्तेजनार्थ घोषित करण्यात आले होते. त्यामुळे पहिल्या क्रमांकाच्या ग्रामपंचायतींला दीड कोटी, द्वितीयला एक कोटी व उर्वरित ग्रामपंचायतींना प्रत्येकी पन्नास लाख रुपये निधी देण्यात आला आहे.
या निधीच्या खर्चाचेही मार्गदर्शन शासनाने केले असून, त्यात प्रामुख्याने गावाचे हरित अच्छादन वाढविणे, वृक्षारोपण करणे, सार्वजनिक उद्याने, जुन्या हरित क्षेत्राचे संवर्धन व देखभाल करणे, रोपवाटिकांचे निर्मिती, जलसंवर्धनाचे उपक्रम, रेन वॉटर हार्वेस्टिंग, नदी, तळे व नाले यांचे पुनर्जीवीकरण करणे, सौरऊर्जा, विद्युत वाहनांना प्रोत्साहन देणे आदी उपक्रमावर सदरची रक्कम खर्च करण्यात यावे असेही नमूद करण्यात आले असून, या रकमेतून घेण्यात आलेली कामे येत्या १२ महिन्यात पूर्ण करण्यात यावी, अशा सूचनाही करण्यात आल्या आहेत.