भगूरला रेशनमध्ये निकृष्ट धान्याचे वितरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 23, 2018 12:34 AM2018-12-23T00:34:26+5:302018-12-23T00:34:56+5:30
भगूर येथील स्वस्त धान्य दुकानातून गेल्या काही महिन्यांपासून दारिद्र्य रेषेखालील शिधापत्रिकाधारकांना निकृष्ट दर्जाच्या गव्हाचे वाटप केले जात असून, या संदर्भात तक्रार करूनही दखल घेतली जात नसल्याने नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे.
भगूर : भगूर येथील स्वस्त धान्य दुकानातून गेल्या काही महिन्यांपासून दारिद्र्य रेषेखालील शिधापत्रिकाधारकांना निकृष्ट दर्जाच्या गव्हाचे वाटप केले जात असून, या संदर्भात तक्रार करूनही दखल घेतली जात नसल्याने नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे. या संदर्भात दुकानदाराने पुरवठा खात्याकडूनच खराब धान्याचा पुरवठा केला जातो, असा पवित्रा घेतला आहे तर पुरवठा खात्याने खराब धान्य दिले जात नाही, असे सांगून या प्रकाराची चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत.
भगूर धान्य दुकान क्रमांक ६७ मधून गेल्या ९ ते १० महिन्यांपासून पिवळी शिधापत्रिकाधारक दारिद्र्य रेषेखालील कुटुंबांना वाटप करण्यात येणारा गहू व तांदूळ अतिशय निकृष्ट असून, गव्हामध्ये खडे व काड्यांचे प्रमाण अधिक असून, काही ठिकाणी धान्याला कीड लागून जाळे लागले आहे. तांदूळदेखील कण्यांचा व खड्यांचा असल्याचे शिधापत्रिकाधारकांचे म्हणणे आहे. सुरुवातीला काही महिने धापत्रिकाधारकांनी धान्याकडे दुर्लक्ष केले, परंतु सातत्याने खराब धान्याचे वितरण केले जात असून, गरीब कुटुंबीयांना दोन रुपये दराने गहू व तीन रुपये दराने तांदूळ मिळत असल्यामुळे त्यांची आर्थिक परिस्थिती पाहता धान्य घेण्याशिवाय पर्याय नाही. भगूर शहरात चार स्वस्त धान्य दुकाने असून, त्यातील काही दुकानांत गहू, तांदूळ, तूरडाळ, उडीदडाळ, साखर बऱ्यापैकी मिळत असले तरी, काही दुकानांतून मात्र निकृष्ट दर्जाचे धान्याचे वाटप केले जाते. या संदर्भात दुकानदारांकडे तक्रार केल्यास शासनाकडूनच निकृष्ट दर्जाचे धान्य पुरविले जात असल्यामुळे दुकानदार काहीच करू शकत नसल्याचे सांगत आहे. यासंदर्भात दुकान क्रमांक ६७चे वितरक विरुभाई आहुजा यांना विचारणा केली असता, त्यांनी सांगितले की, पुरवठा विभागाकडून गेल्या काही महिन्यांपासून खराब धान्याचा पुरवठा केला जात असून, अजूनही माझ्याकडे तीन कट्टे पडले आहेत. त्यातही चांगले धान्य देण्याचा प्रयत्न करीत आहे.
शहर धान्य पुरवठा अधिकारी अनिल पुरे यांनी, खराब धान्याचा पुरवठा केला जात नसल्याचा दावा करून, जर रेशन दुकानदारांना खराब धान्य आले असेल तर त्यांनी वाटप न करता त्यांनी पुरवठा कार्यालयात धान्य जमा करावे, असे सांगून खराब धान्याची चौकशी केली जाईल असे सांगितले. त्यानुसार पुरवठा निरीक्षकांना चौकशी करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.