‘राज्य नाट्य’चे पारितोषिक वितरण नाशकात
By Admin | Published: June 6, 2015 12:37 AM2015-06-06T00:37:42+5:302015-06-06T00:37:59+5:30
गुरुवारी कार्यक्रम : कलावंतांचा होणार सन्मान
नाशिक : महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या वतीने घेण्यात आलेल्या महाराष्ट्र राज्य नाट्य स्पर्धा व बालनाट्य स्पर्धेच्या प्राथमिक फेरीतील नाशिक विभागाचा पारितोषिक वितरण सोहळा येत्या गुरुवारी (दि. ११) सायंकाळी ६.३० वाजता महाकवी कालिदास कलामंदिर येथे आयोजित करण्यात आला आहे.
यंदा नाशिक विभागातून राज्य नाट्य स्पर्धेत ४०, तर बालनाट्य स्पर्धेत ३२ संस्थांनी नाटके सादर केली होती. नाशिक विभागातील नाशिक, जळगाव व अहमदनगर या स्पर्धा केंद्रांवरील प्राथमिक फेरीतील ८८ विजेत्या कलाकारांना प्रमाणपत्र, रौप्यपदक व धनादेश देऊन गौरविण्यात येणार आहे. उत्कृष्ट नेपथ्य, प्रकाशयोजना, दिग्दर्शन, रौप्यपदके व अभिनयाची गुणवत्ता प्रमाणपत्रेही यावेळी वितरित करण्यात येणार आहेत.
या सोहळ्यात मराठी रंगभूमी व राज्य नाट्य स्पर्धेतील गेल्या साठ वर्षांतील योगदानाचा आढावा घेणाऱ्या ध्वनिचित्रफिती दाखविण्यात येणार आहेत. त्यांत विजया मेहता, माधव वझे, कमलाकर सोनटक्के, कमलाकर नाडकर्णी, बापू लिमये, प्रशांत दळवी, जयंत पवार, अरुण नलावडे यांसारख्या मान्यवरांचा सहभाग आहे.
यांचा होणार गौरव...
गुरुवारच्या कार्यक्रमात ‘न हि वैरेन वैराणी’ हे नाटक व ‘म्या बी शंकर हाय’ या बालनाट्यासह नाशिकचे दिग्दर्शक मुकुंद कुलकर्णी, हेमंत देशपांडे, माणिक कानडे, ईश्वर जगताप यांचा गौरव होणार आहे. पारितोषिक वितरणाचा मान प्रमुख मान्यवरांसह स्थानिक रंगकर्मींनाही दिला जाणार आहे. (प्रतिनिधी)