जिल्हा परिषदेच्या दहा शाळांना टॅबचे वाटप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 8, 2019 07:09 PM2019-08-08T19:09:53+5:302019-08-08T19:11:17+5:30
गेल्या आठवड्यातच जिल्हा परिषद अध्यक्ष शीतल सांगळे यांनी दिल्ली येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेऊन डिजिटल स्कूलचे सादरीकरण केले होते. सीएसआरच्या माध्यमातून जिल्हा परिषदेच्या शंभर शाळांमध्ये टप्पाटप्प्याने हा प्रयोग राबविण्यात येणार आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नाशिक : ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांची शैक्षणिक गुणवत्ता वाढीसाठी नालंदा प्रोजेक्टच्या माध्यमातून जिल्हा परिषदेच्या दहा शाळांना चारशे टॅबचे वाटप जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष शीतल सांगळे यांच्या हस्ते करण्यात आले. इयत्ता तिसरी ते सहावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी इंग्रजी व गणित विषयाच्या अभ्यासक्रमाचा टॅबमध्ये समावेश असून, प्रत्येक विद्यार्थ्याला सदरचा टॅब हाताळण्यास मिळणार आहे.
गेल्या आठवड्यातच जिल्हा परिषद अध्यक्ष शीतल सांगळे यांनी दिल्ली येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेऊन डिजिटल स्कूलचे सादरीकरण केले होते. सीएसआरच्या माध्यमातून जिल्हा परिषदेच्या शंभर शाळांमध्ये टप्पाटप्प्याने हा प्रयोग राबविण्यात येणार आहे. नालंदा प्रोजेक्टने पहिल्या टप्प्यात चारशे टॅब उपलब्ध करून दिले असून, त्याचे वाटप जिल्ह्यातील दहा सेमी इंग्रजीच्या शाळांना करण्यात आले. जिल्हा परिषदेच्या सभागृहात झालेल्या एका सोहळ्यात शिक्षण सभापती यतिन पगार, शिक्षणाधिकारी वैशाली झनकर यांच्या उपस्थितीत सदर शाळेचे मुख्याध्यापक व गट शिक्षणाधिकाऱ्यांच्या ताब्यात टॅब, चार्जिंग सर्किट व एक लॅपटॉप साहित्य सुपुर्द करण्यात आले. डिजिटल शिक्षणासाठी जिल्हा परिषदेच्या शाळांकडून प्रस्ताव मागविण्यात आले होते. त्यासाठी सुमारे बाराशे शाळांनी तशी तयारी दर्शविली होती. त्यातून ३६० शाळांची निवड करण्यात आली. शिक्षणाधिकारी व शिक्षणतज्ज्ञांकडून या शाळांना प्रत्यक्ष भेट देण्यात आली व त्यातून ३० शाळा अंतिम निवडीसाठी पात्र ठरविण्यात आल्या त्यातूनही फक्त दहा शाळांची निवड करण्यात आली. या दहा शाळांना प्रत्येकी ४० याप्रमाणे ४०० टॅबचे वाटप करण्यात आले. डिजिटल शिक्षणाविषयी अगोदर शिक्षकांना प्रशिक्षण देण्यात आले असून, या टॅबमध्ये इयत्ता तिसरी ते सहावीच्या विद्यार्थ्यांसाठी अभ्यासक्रम समाविष्ट करण्यात आला असून, तासिकेनुसार टप्पाटप्प्याने वरच्या वर्गातील विद्यार्थ्यांनाही तो एकाच दिवसात वापरता येणार आहे. बुधवारी सकाळच्या सत्रात टॅबच्या हाताळणीविषयी कार्यशाळा घेण्यात आली. यावेळी गणित मित्र वाल्मीक चव्हाण यांनी त्यांना मार्गदर्शन केले.