दातली व शहापूरला पाण्याच्या टाक्यांचे वाटप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 27, 2019 05:42 PM2019-05-27T17:42:14+5:302019-05-27T17:42:44+5:30
सिन्नर तालुक्यातील दातली व शहापूर या गावांमध्ये पिण्याच्या पाण्याच्या टाक्यांचे मोफत वितरण करण्यात येऊन पाणी वाटप करण्यात आले.
सिन्नर : तालुक्यातील दातली व शहापूर या गावांमध्ये पिण्याच्या पाण्याच्या टाक्यांचे मोफत वितरण करण्यात येऊन पाणी वाटप करण्यात आले.
यावर्षी तालुक्यात १९७२ च्या दुष्काळ पेक्षा भयावह परिस्थिती निर्माण झाली आहे. संपूर्ण राज्य दुष्काळणे होरपळून निघाले आहे. नाशिक जिल्ह्यातील सिन्नर तालुका देखील याला अपवाद नाही. सामाजिक बांधिलकीतून दातली व शहापूर येथे प्रत्येकी दोन हजार लिटर क्षमतेच्या दोन पाण्याच्या टाक्या देण्यात आल्या.
अॅड. दिलीप केदार व तालुकाध्यक्ष विलास सांगळे यांच्या प्रमुख उपस्थितीत पाण्यांच्या टाक्यांचे वाटप करण्यात आले. तसेच पाण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली. यामुळे महिलांना पाण्यासाठी करावी लागणारी धावपळ कमी होण्यास मदत होणार असल्याचे मत सांगळे यांनी यावेळी व्यक्त केले. दोन्ही गावातील ग्रामस्थांनी मातोश्री सेवा संस्था व महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्याया उपक्रमाबद्दल आभार मानले. याप्रसंगी जिजाबाई बर्डे, सिंधू बर्डे, मुक्ता बर्डे, भारती सोनवणे, राजू सोनवणे, रामनाथ सोनवणे, संजय केदार, काशिनाथ केदार आदींसह महिला व पुरूष मोठ्या संख्येने उपस्थित होते.